सांगली : ऊसदरासाठी रयत क्रांती संघटनेकडून जिल्ह्यातील कारखानदारांना आठवडाभराची मुदत

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेकडून पहिल्या टप्प्यात मोर्चा काढण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ईश्वरपूरमध्ये मशाल रॅली काढण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी आंदोलन केले. येत्या सात दिवसांत उसाला भाव जाहीर केला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला. जिल्ह्यातील साखर कारखानदारांमुळे शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे, असा आरोप खोत यांनी केला. आमदार जयंत पाटील यांच्यावर खोत यांनी जोरदार हल्लाबोल केला.

रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करून राज्य सरकारसह साखर कारखानदारांविरोधात तीव्र निषेध केला. संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौकातील लोकनेते राजारामबापू पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर शेतकऱ्यांनी खर्डा-भाकरी खाऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. ऊसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. कारखाने सुरू होऊन एक महिना झाला तरी कारखानदार उसाला काय भाव देणार ते सांगायला तयार नाहीत असा आरोप खोत यांनी केला. आंदोलनावेळी पृथ्वीराज पवार, गौतम पवार, डॉ. प्रदीप पाटील, कसबे डिग्रज पंचायत समिती सदस्य विनायक जाधव, रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here