सोलापूर : ऊसदरासाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सोलापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्या प्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन ३९०० रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी, दि. १६ रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावोगावी शेतकऱ्यांत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा तालुका व गाव पातळीवरील कार्यकर्ते यात सक्रीय असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली. तर शेतकरी प्रश्नासाठी व न्याय मिळवण्या साठी सोमवारच्या मोर्चात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह ताकदीने सहभागी होणार आहोत. कारण शेतकरी संघटना कुठलीही असो मागणी एकच आहे असे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी जाहीर केले आहे.

दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी पंढरपूरला येऊन शेतकऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व मोर्चाची रणनीती ठरविली. मागण्या मान्य झाल्या शिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. विशेष करून शेतकऱ्यांची तरुण मुले मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होणार असल्याच्या हालचाली आहेत. स्वाभिमानीचे जिल्हा संघटक शहाजहान शेख म्हणाले की, गेल्या दोन दिवसा पासून गावोगावी फिरून शेतकऱ्यांच्या बैठका घेत आहोत. तसेच मोबाईल द्वारे मेसेज पाठवीत आहोत. बैठकीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहात आहेत, तसेच विविध राजकीय पक्ष संघटना यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. तर जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांनी सांगितले की, शेतकरी अडचणीत आहे. रासायनिक खते, जमिनीची मशागत व मजुरांची मजुरी वाढली आहे. त्यामुळे ऊस दर वाढवून मिळणे गरजेचे आहे. पक्ष संघटना बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्या साठी मोर्चात सहभागी होणार आहोत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक बोलावली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकवून त्या बैठकीला कारखानदार उपस्थित राहिले नाहीत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here