नवी दिल्ली : साखर कारखान्यांकडून मासिक साठा मर्यादा आणि देशांतर्गत विक्री कोट्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर कारवाईसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागांतर्गत साखर व वनस्पती तेल संचालनालयाने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, निर्धारित साठा मर्यादेपेक्षा जास्त साखर विक्री किंवा जास्त साखर पाठवणाऱ्या कारखान्यांच्या अतिरिक्त विक्रीची मात्रा पुढील महिन्याच्या देशांतर्गत रिलीज कोट्यातून वजा केली जाईल.
हे निर्देश सर्व साखर कारखान्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहेत. यापूर्वी २८ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या पत्राच्या जागी नवीन मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत.
साठा मर्यादेचे उल्लंघन केल्यास पुढील महिन्याच्या कोट्यात कपात
विभागाच्या माहितीनुसार, साखर कारखान्यांकडून NSWS पोर्टलवर P-II फॉर्मद्वारे सादर करण्यात आलेली माहिती आणि GSTN कडून API च्या माध्यमातून मिळणाऱ्या विक्रीच्या आकडेवारीचे विश्लेषण केले जाते. या विश्लेषणात काही साखर कारखाना समूह आणि स्वतंत्र कारखाने वारंवार निर्धारित साठा मर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. यापूर्वी वारंवार सूचना देऊन तसेच देशांतर्गत रिलीज कोट्यात कपात करूनही असे प्रकार सुरू असल्याचे सरकारने नमूद केले आहे.
एखाद्या स्वतंत्र साखर कारखान्याने किंवा कारखाना समूहाने संबंधित महिन्याची निर्धारित साठा मर्यादा ओलांडली किंवा मंजूर देशांतर्गत रिलीज कोट्यापेक्षा जास्त साखरेची विक्री अथवा पाठवठा केला, तर अतिरिक्त मात्रा पुढील महिन्याच्या देशांतर्गत रिलीज कोट्यातून वजा केली जाईल.कारखान्याकडे पुरेसा साठा नसल्यामुळे एका महिन्यात संपूर्ण अतिरिक्त विक्रीची कपात करणे शक्य न झाल्यास उर्वरित मात्रा पुढील महिन्यात आणि त्यानंतरच्या महिन्यांत समायोजित केली जाईल. संपूर्ण अतिरिक्त विक्रीची मात्रा कोट्यातून वजा होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.
साठ्याची प्रत्यक्ष तपासणी; कायदेशीर कारवाई
केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त पथकांकडून साखर कारखान्यांच्या साठ्याची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल.याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांना अतिरिक्त साखर कोटा दिला जाणार नाही. संबंधित ऊस आयुक्त किंवा राज्य सरकारने शिफारस केली तरी अशा कारखान्यांना अतिरिक्त कोटा देण्याचा विचार केला जाणार नाही.
एका वर्षात तीन वेळा उल्लंघन केल्यास सरकारी योजनांचे लाभ बंद
एका वर्षाच्या कालावधीत दोनपेक्षा अधिक वेळा मासिक साठा मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांसाठी सरकारने आणखी कठोर तरतुदी केल्या आहेत.अशा कारखान्यांना अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ दिले जाणार नाहीत. यामध्ये लागू असल्यास निर्यात कोटा आणि प्रोत्साहन योजनांचाही समावेश असेल. तिसऱ्यांदा उल्लंघन झालेल्या महिन्यापासून ही बंदी लागू होईल. संबंधित योजनेतील तरतुदींनुसार पुढील निर्णय घेतला जाईल.
उदाहरणार्थ, निर्यात कोट्याची अधिसूचना १ डिसेंबर २०२६ रोजी जारी झाल्यास, त्यापूर्वीच्या एका वर्षातील म्हणजेच १ डिसेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील उल्लंघनांचा विचार केला जाईल. या कालावधीत तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करणारा कारखाना निर्यात कोटा मिळविण्यास अपात्र ठरेल.
राज्य सरकारांकडूनही कारवाई
वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध संबंधित राज्य सरकारांना कारवाई करण्याचा सल्ला दिला जाईल. यामध्ये गाळप परवाना जारी न करणे, कारखान्याशी संलग्न ऊस क्षेत्र कमी करणे किंवा अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत अन्य योग्य कारवाई करण्याचा समावेश आहे.नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांना IEM मध्ये गाळप क्षमता बदलण्यासाठी किंवा मालकी हस्तांतरण वगळता नावात बदल करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले जाणार नाही.
९० टक्क्यांपेक्षा कमी कोटा वापरल्यासही कारवाई
एखाद्या साखर कारखान्याने संबंधित महिन्यात मंजूर देशांतर्गत रिलीज कोट्याच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी कोट्याचा वापर केला आणि त्या महिन्याच्या २० तारखेपर्यंत विभागाला पूर्वसूचना दिली नाही, तर पुढील महिन्याचा कोटा कमी केला जाईल.पुढील महिन्याचे कोटा वाटप संबंधित कारखान्याने मागील महिन्यात प्रत्यक्षात वापरलेल्या कोट्याच्या टक्केवारीनुसार निश्चित केले जाईल.
GST रिटर्नमध्ये HSN कोडनुसार माहिती देणे बंधनकारक
साखर कारखान्यांसाठी GST आणि HSN कोडसंदर्भातील अहवाल नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.ज्या कारखान्यांनी त्यांच्या मासिक GSTR-1 रिटर्नमधील टेबल-१२ मध्ये साखरेची विक्री आणि पाठवठ्याची अचूक HSN कोडनुसार माहिती दिलेली नाही, त्यांना देशांतर्गत रिलीज कोटा दिला जाणार नाही.संबंधित कारखान्याने योग्य माहिती सादर करून विभागाकडून तिच्या अनुपालनाची पडताळणी होईपर्यंत त्याचा देशांतर्गत रिलीज कोटा स्थगित ठेवण्यात येईल.
अतिरिक्त कोटा मिळविण्यासाठी नवीन अटी
केंद्र सरकारने अतिरिक्त कोटा वाटपासाठीही कठोर अटी निश्चित केल्या आहेत. ज्या कारखान्यांचे देशांतर्गत कोटा समायोजन किंवा कोटा अदलाबदल (स्वॅपिंग) संदर्भातील समायोजन प्रलंबित आहे, त्यांच्या अतिरिक्त कोट्याच्या मागणीवर विचार केला जाणार नाही.तसेच, एखाद्या व्यापाऱ्याला, एजंटला किंवा घाऊक ग्राहकाला साखर विकल्यानंतर सात दिवसांपेक्षा जास्त काळ संबंधित साखरेचा साठा स्वतःच्या परिसरात ठेवणाऱ्या कारखान्यांच्याही अतिरिक्त कोट्याच्या मागणीवर विचार होणार नाही.
या नियमासाठी विक्रीची तारीख म्हणजे संबंधित साखर कारखान्याने विक्रीचे इनव्हॉइस तयार करून जारी केलेली तारीख मानली जाईल.DFPD च्या स्टॉक मॉनिटरिंग पोर्टलवर नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्याशी विक्रीचा व्यवहार केलेल्या कारखान्यांनाही अतिरिक्त कोटा दिला जाणार नाही.
अतिरिक्त कोटा एका वेळी जास्तीत जास्त एका महिन्यासाठीच मंजूर केला जाईल. त्यासाठी राज्य सरकार किंवा संबंधित ऊस आयुक्तांची शिफारस आवश्यक असेल. एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी शिफारस करण्यात आली तरी केवळ एका महिन्याच्या कोट्याचाच विचार केला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक मागणीची नव्याने तपासणी केली जाईल.राज्य सरकार किंवा ऊस आयुक्तांची शिफारस मिळाली म्हणजे अतिरिक्त कोटा मिळण्याचा आपोआप अधिकार प्राप्त होत नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
लीज करारानुसार गोदामात ठेवलेल्या साखरेची माहिती तीन दिवसांत द्यावी लागणार
एखाद्या साखर कारखान्याने घाऊक ग्राहक, एजंट किंवा व्यापाऱ्याला विकलेली साखर लीज करारानुसार स्वतःच्या गोदामात ठेवली असल्यास, त्याची माहिती तीन दिवसांच्या आत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाला देणे बंधनकारक असेल.या माहितीत गोदामात ठेवलेल्या साखरेचे प्रमाण, ती किती कालावधीसाठी ठेवली जाणार आहे, याचा तपशील तसेच लीज कराराची प्रत सादर करावी लागेल.अशी माहिती विभागाला न दिल्यास आणि प्रत्यक्ष तपासणीदरम्यान संबंधित साखरेचा साठा आढळल्यास तो साखर कारखान्याच्याच साठ्याचा भाग मानला जाईल.
GST मध्ये ट्रेडिंग विक्री दाखवून कारवाई टाळता येणार नाही
मासिक देशांतर्गत रिलीज कोट्यापेक्षा अधिक विक्री झालेली साखर P-II फॉर्म किंवा GST आकडेवारीमध्ये नोंदवली गेली असल्यास, ती संबंधित कारखान्याची एकूण विक्री मानली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.एखाद्या कारखान्याने मंजूर देशांतर्गत कोट्यापेक्षा अधिक साखरेची विक्री केली, तर ती कारखान्याचीच विक्री समजली जाईल. संबंधित कारखान्याने GST रिटर्नमध्ये ही अतिरिक्त मात्रा थेट विक्रीऐवजी ट्रेडिंग विक्री म्हणून दाखवली तरी हा नियम लागू राहील.अशा अतिरिक्त विक्रीची संपूर्ण मात्रा कारखान्याच्या एकूण देशांतर्गत विक्रीमध्ये समाविष्ट केली जाईल आणि मासिक साठा मर्यादेचे उल्लंघन मानले जाईल.
१३ नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने स्पष्ट केले आहे की, हे नवीन मार्गदर्शक नियम पत्र जारी झाल्याच्या तारखेपासून म्हणजेच १३ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होतील.सर्व साखर कारखान्यांनी मासिक साठा मर्यादेसंदर्भातील आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध वरील तरतुदींनुसार कठोर कारवाई केली जाईल.हे पत्र साखर व वनस्पती तेल विभागाचे संचालक अरविंद कुमार रावत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

















