कोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटल्यानंतरही शिरोळ तालुक्यात सुरू राहिलेल्या आंदोलनामुळे चार दिवस उशिराने हंगाम सुरू झाला आहे. आंदोलन अंकुशने आंदोलन मागे घेतल्यानंतर तालुक्यातील गावागावांत पहाटेपासूनच ऊसतोडी सुरू होत आहेत. शिरोळ तालुक्यातील दत्त आणि गुरुदत्त साखर कारखान्याचा ऊसतोड हंगाम गतिमान झाला आहे. त्याचबरोबर शिरोळ तालुक्यात विविध साखर कारखान्यांसाठी ऊसतोडी सुरू झाल्या आहेत. पहाटेपासूनच ऊस तोड मजूर, स्थानिक तरुणांच्या टोळ्या ऊस तोडीसाठी सरसावत आहेत. दुष्काळजन्य परिस्थिती, पाणी टंचाई, उपसाबंदीची टांगती तलवार अशा विविध पातळ्यांवर यावर्षी हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर ऊस दराचे आंदोलन शेतकरी अथवा कारखानदारांसाठी नुकसानकारक ठरणार होते. मात्र, आंदोलन मागे घेतल्यानंतर ऊसतोड हंगाम चांगलाच गतिमान झाला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशने दराच्या मागणीसाठी ऊसतोड रोखल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हंगाम पूर्णपणे ठप्प होता. प्रशासनाने काढलेल्या ३,९०० रुपयांच्या पहिली उचल देण्याच्या तोडग्यानंतर ऊसदराचा प्रश्न संपुष्टात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याला सहमती दर्शवली. मात्र आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ४,५०० रुपये ऊस दर देण्यासाठी लढा सुरू ठेवला होता. नंतर त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यात ऊसतोडी गतीने सुरू झाल्या आहेत. शिरोळ तालुक्यातून दत्त व गुरुदत्तबरोबरच हातकणंगले तालुका, सांगली जिल्हा व कर्नाटक सीमा भागातील साखर कारखान्यांसाठी ऊस पुरवठा केला जातो. आता तोडणीला गती मिळाल्याने बीड, लातूर आदी भागातून आलेल्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांना दिलासा मिळाला आहे.


















