अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर, हिरडगाव कारखान्याने गतवर्षी गाळपासाठी ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊसबिलाचा दुसरा हप्ता प्रतिटन २०० रुपये जमा केला आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या प्रतिटन ३,१०० रुपयांसह आता शेतकऱ्यांना एकूण प्रतिटन ३,३०० रुपये ऊसदर मिळाला आहे. अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली.
बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुपने साखर उद्योगाच्या विस्तारासोबतच शेतकरी हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा साखर कारखान्याच्या प्रगतीचा प्रमुख आधार असल्याने त्यांना योग्य ऊसदर देणे आणि ऊसबिलांची रक्कम वेळेत अदा करणे, हे समूहाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याच्या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार, कामगार तसेच अधिकारी-कर्मचारी या सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सर्व घटकांमध्ये समन्वय राखून कारखान्याचे कामकाज अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यावर समूहाचा भर आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, त्यांना आर्थिक नियोजन करणे सुलभ व्हावे आणि कारखाना व शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. बँक खात्यावर रक्कम जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांचे सहकार्य आणि विश्वास हीच कारखान्याच्या यशाची खरी ताकद आहे. भविष्यातही शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत साखर उद्योगाची प्रगती साधण्यासाठी ओंकार शुगर ग्रुप कटिबद्ध राहील, असा विश्वास समूहाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


















