ब्राझिलिया : सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने जगातील सर्वांत मोठा साखर निर्यातदार असलेल्या ब्राझीलमध्ये यंदा साखर उत्पादनात घट झाली आहे. सद्यस्थितीत ऊस गाळपाचा वेग मंदावला, असे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) अहवालात म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये देशातील ऊस गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.९ टक्क्यांनी घटले. २०१८-१९ नंतर सप्टेंबरमधील ही सर्वांत मोठी घट आहे. पावसाचा फटका उसाच्या दर्जालाही बसला. अति पावसामुळे उसातील साखरेचे प्रमाण कमी झाले. एक टन उसापासून मिळणाऱ्या साखरेचे प्रमाण १३८.७ किलोवरून १३४.१ किलोपर्यंत घसरले. त्यामुळे यूएसडीएने २०२६-२७ हंगामाचे अंदाज घटवले आहेत. गाळप रखडल्याने कारखाने डिसेंबरपर्यंत गाळप सुरू ठेवण्याचा किंवा पुढील हंगाम फेब्रुवारीतच सुरू करण्याचा विचार करत आहेत. तरीही सुमारे ३०० लाख टन ऊस पुढील हंगामासाठी शिल्लक राहील, असा विश्लेषकांचा अंदाज असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
ब्राझीलचा साखर हंगाम एप्रिल ते मार्च असा असतो. मुख्य ऊस उत्पादक पट्टा असलेल्या मध्य-दक्षिण भागात पावसामुळे कारखान्यांना गाळपाचा वेग कमी करावा लागला. देशातील साखर कारखान्यांनी एक एप्रिल ते १५ ऑक्टोबर या काळात तेथे ३१५ लाख टन साखर तयार केली. गेल्या वर्षी याच काळात ३६७ लाख टन उत्पादन झाले होते. म्हणजेच उत्पादनात १४ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘यूएसडीए’च्या ब्राझिलियातील कार्यालयाने नोव्हेंबरमधील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये ऊस उत्पादनाचा अंदाज ६९५० लाख टनांवरून ६८१० लाख टनांवर आणला आहे. साखर उत्पादनाचा अंदाज ४२२ लाख टनांवरून ४०५ लाख टनांवर, तर निर्यातीचा अंदाज ३३३ लाख टनांवरून ३१७ लाख टनांवर आणला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळात ब्राझीलची साखर निर्यात १७.४ टक्क्यांनी घटून १४६ लाख टनांवर आली.

















