मराठवाड्यात पहिल्या उचलीचा तिढा सुटेना; ऊस दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक

धाराशिव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र आंदोलनानंतर कोल्हापूर आणि सांगली पट्ट्यातील साखर कारखानदार व शेतकरी संघटनांमध्ये यशस्वी तोडगा निघाला आहे. त्यानुसार, तेथील शेतकऱ्यांना प्रतिटन तीन हजार ९०० रुपये पहिली उचल, हंगाम संपल्यानंतर अतिरिक्त १०० रुपये आणि साखरेचे बाजारभाव वाढल्यास आणखी २०० रुपये, असा एकूण चार हजार २०० रुपये प्रतिटन दर मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. याउलट, मराठवाड्यात बोटावर मोजण्याइतक्याच कारखान्यांनी तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर जाहीर केला आहे. उर्वरित कारखान्यांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. ‘पश्चिम महाराष्ट्रात मिळणारा दर मराठवाड्यात का दिला जात नाही? कारखानदार आणि सरकारला येथेही तीव्र आंदोलनाचीच प्रतीक्षा आहे का?’ असा सवाल शेतकरी सोशल मीडियासह गावपातळीवरील बैठकांमधून उपस्थित करत आहेत.’

सद्यस्थितीत मराठवाड्यात सुमारे ४४ साखर कारखाने सुरू आहेत. मात्र, उसाच्या पहिल्या उचलीचा (एफआरपी) तिढा सुटलेला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल देण्याचे मान्य केले असताना, मराठवाड्यातील कारखानदारांनी ३,००० रुपयांपेक्षाही कमी पहिली उचल जाहीर केली आहे किंवा अद्याप दर जाहीर केलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रात कारखानदारांना प्रतिटन ४,२०० रुपये दर देणे परवडते, तर मग मराठवाड्यातील कारखानदारांना का परवडत नाही. कारखानदारांनी शेतकऱ्यांना गृहीत धरू नये. तातडीने ३,६०० रुपये पहिली उचल जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल. ऊस उत्पादक संघर्ष समितीचे समन्वयक अविनाश मांगदरे म्हणाले की, वर्षभर रक्ताचे पाणी करून आणि पाणीटंचाईवर मात करत आम्ही ऊस जगवला. खते, बियाणे, मजुरी आणि तोडणीचा खर्च गगनाला भिडला आहे. अशा परिस्थितीत तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हा दुजाभाव आम्ही सहन करणार नाही.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here