साखर उद्योग अडचणीत, पुढील हंगामातही साखरेचा तुटवडा भासण्याची भीती : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

पुणे : देशाला चालू वर्षात सुमारे २८५ लाख मेट्रिक टन साखरेची आवश्यकता असून, पुढील हंगामासाठी किमान ५० लाख मेट्रिक टन ‘ओपनिंग स्टॉक’ आवश्यक आहे. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी देशाला एकूण सुमारे ३३५ लाख मेट्रिक टन साखरेची गरज भासणार आहे. मात्र, २०२६-२७ च्या हंगामातील संभाव्य उत्पादन पाहता ही गरज पूर्ण होण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. डिसेंबरमध्ये उत्पादनाचे चित्र अधिक स्पष्ट होईल; मात्र देशात साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याची भीती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. बिजवडीतील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध शिथिल करून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारी टिकविण्यासाठी शासनाने वेळकाढूपणा न करता ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. इथेनॉल प्रकल्प बंद राहिल्यास कारखान्यांना कर्जफेड आणि बँकांचे हप्ते भरणे कठीण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, केंद्र शासनाकडून साखर व इथेनॉल धोरणासंदर्भात वेळेवर निर्णय होत नसल्याने साखर उद्योगासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दुष्काळाचे सावट तीव्र होत असताना चालू व आगामी हंगामातील ऊस उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती आहे. त्यातच इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध कायम राहिल्यास आधीच आर्थिक अडचणीत असलेली साखर कारखानदारी अधिक संकटात येईल. देशभरात सहा कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी असून, ऊस शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शासनाने साखर उद्योगासमोरील प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम होत आहे. पूर्वी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत होते. त्यामुळे ऊस उत्पादकांना चांगला होत होते. मात्र, शासनाच्या सध्याच्या इथेनॉल प्रकल्पांवर परिणाम होऊन कारखान्यांची आर्थिक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. इथेनॉल धोरणात तातडीने बदल करून आवश्यक तेवढे नियंत्रण ठेवावे; अन्यथा कारखाने आर्थिक संकटात सापडून उद्योगासमोर गंभीर स्थिती निर्माण होईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

ChiniMandi WhatsApp Channel

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here