पुणे : तळेगाव दाभाडे येथे रविवारी (ता.१५) केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल हेवी इंजिनिअरिंग या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. साखर उद्योगाला स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक आणि किफायतशीर यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली. देश-विदेशातील साखर कारखान्यांना मशिनरी पुरविण्यात संस्थेने योगदान दिले. मात्र, बदलत्या आर्थिक परिस्थितीत २०११ मध्ये ही संस्था बंद पडली. स्व. शंकरराव कोल्हे यांनी २०१६ पर्यंत त्याच्या पुनर्निर्माण कार्यासाठी प्रयत्न केले; पण ते आजारी पडल्याने या कार्यात अडथळा आला. आजोबांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी आपण पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री शहा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी यावेळी केले.
आमदार कोल्हे म्हणाले की, साखर कारखान्यांसाठी लागणाऱ्या बॉयलर, इथेनॉल संयंत्र, कंटेनर या मशिनरींचे उत्पादन येथे होणार आहे. हा संकेत सहकारक्षेत्राच्या बळकटीकरणांसाठी शुभ आहे. केंद्रीय सहकारमंत्री शहा यांनी देशातील आठ लाख सहकारी संस्थेच्या कामकाजात सुसूत्रपणा आणत आधुनिक तंत्रज्ञानाचा आमुलाग्र वापर करून ग्रामीण भागात सहकार क्षेत्राचे जाळे अधिक विस्तीर्ण व्हावे म्हणून काम सुरू केले. याचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी नॅशनल हेवी इंजिनिअरिंग बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनर्निर्माणासाठी १,५०० कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली. यातून साखर कारखानदारीला आवश्यक मशिनरी निर्मितीमध्ये देशाला चालना मिळणार आहे.


















