छत्रपती संभाजीनगर : बारामती अॅग्रोच्या कन्नड युनिटसमोर स्वाभिमानीचे आंदोलन, ४२०० प्रतिटन ऊस दरासाठी गव्हाण केली बंद

छत्रपती संभाजीनगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी बारामती अॅग्रो साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक दोनसमोर (कन्नड) ठिय्या आंदोलन केले. कारखान्याची गव्हाण बंद पाडत सुरू असलेले गाळप ठप्प केले. उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर आणि ३,९०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, बारामती अॅग्रो युनिट २ चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी ४२०० रुपये दर कोणी निश्चित केला असेल, तर त्याचे गणित आम्हाला समजावून सांगावे अशी भूमिका घेतली. सध्या कारखान्याची रिकव्हरी अवघी ८.३० ते ८.७५ टक्के आहे. अशा परिस्थितीत आम्ही हा दर कसा देणार? ऊसदर हा रिकव्हरीवर अवलंबून असतो; ‘कोल्हापूर’ची तुलना ‘बारामती’शी होऊ शकत नाही. आमची एफआरपी ३९१२ रुपये असून रिकव्हरीनुसारच अंतिम दर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे संघटना आक्रमक झाली.

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी चर्चेसाठी वारंवार आवाहन करूनही कारखाना प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी न आल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वार ओलांडून थेट गव्हाणीत धाव घेतली. आंदोलनात कृषिभूषण भाऊसाहेब थोरात, पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर झाल्टे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सांबळे, तालुकाध्यक्ष प्रकाश बोरसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, दिनकर पवार, सुनील बोडखे, अविनाश डगळे, शिवाजी बचाटे, राजू बोंगाने, सचिन गायके, एस.बी. अकोलकर, किसन शेजवळ, दीपक शेजवळ यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. सोमवारी दुपारी १२.५५ वाजेपासून सुरू झालेले गव्हाण बंद आंदोलन रात्री साडेअकरापर्यंत सुरूच होते. कारखाना प्रशासन आणि आंदोलकांमध्ये रात्री उशिरापर्यंत कोणताही तोडगा निघाला नव्हता. कडाक्याच्या थंडीतही आंदोलक रात्रभर ऊसाच्या गव्हाणीत ठाण मांडून बसले होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here