छत्रपती संभाजीनगर : बारामती अॅग्रो साखर कारखान्याने ४,२०० रुपये ऊस दर द्यावा या मागणीसाठी यापूर्वी १७ ऑक्टोबर व १६ नोव्हेंबर रोजी केलेले गव्हाण बंद आंदोलन शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन मागे घेतले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरही तोडगा निघालेला नाही. कारखाना वेळकाढूपणा करत असल्याने आता आंदोलनाचा कालावधी अनिश्चित असेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सदस्य कृषीभूषण भाऊसाहेब थोरात यांनी दिला. शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. कारखाना प्रशासन मुद्दाम टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाऊसाहेब थोरात म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४,२०० रुपये दर आणि पहिली उचल ३,९०० रुपये द्यावी, ही आमची मागणी कायम आहे. ही मागणी मान्य न झाल्यास रविवारी (ता. २२) सोलापूर-धुळे महामार्गावरील पाणपोई फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले जाईल. यापूर्वी आम्ही शेतातील तोडलेल्या उसाचा विचार करून दोनदा आंदोलन मागे घेतले. मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. ऊस वाहतूकदारांनी परिस्थिती पाहूनच वाहतुकीचे नियोजन करावे आणि शेतकऱ्यांनी ऊस दर आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, तालुकाध्यक्ष प्रकाश बोरसे, दिनकर पवार, अविनाश डगळे, शिवाजी बचाटे, राजू बोंगाणे, दीपक शेजवळ उपस्थित होते.

















