पुणे : तळेगाव दाभाडे येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन, पुण्यात सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक (सीआरसीएस) यांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पुण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ केंद्रीय सहकारमंत्री तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही बहुराज्य सहकारी संस्था दीड हजार कोटी रुपयांच्या वित्तीय सहाय्याने पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी घोषणा मंत्री अमित शहा यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, केंद्रीय सहकार सचिव आशिषकुमार भुटानी उपस्थित होते.
केंद्रीय सहकारमंत्री शहा म्हणाले की, महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा समृद्ध वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. देशाच्या पश्चिम विभागातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर आधारित आणि कमिशनविरहित ‘भारत टॅक्सी’ सेवेमुळे टॅक्सीचालकांना केवळ चालक न राहता स्वतःच्या सेवेचे मालक होण्याची संधी मिळेल. केंद्र सरकारने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पश्चिम विभागीय कार्यालयामुळे महाराष्ट्रासह पश्चिम विभागातील बहुराज्य सहकारी संस्थांना प्रशासकीय कामकाजासाठी मोठी मदत होणार असल्याचे सांगितले.


















