छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर प्रतिटन ४२०० रुपये ऊसदर मिळावा आणि पहिली उचल ३९०० रुपये द्यावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने तात्पुरता ब्रेक लागला आहे. गंगापूर तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे सोमवारपासून (ता. १६) सुरू असलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १८ नोव्हेंबर) शेतकरी आणि साखर कारखानदारांची संयुक्त बैठक बोलावल्याने हा निर्णय घेण्यात आला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला मिळावा आणि प्रतिटन ४२०० रुपये दर निश्चित करावा, या प्रमुख मागणीसाठी संघर्ष समितीने जुने कायगाव येथे अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. आंदोलनाची दखल घेत परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी अविनाश लोंढे यांनी मंगळवारी (ता. १७) आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या संयुक्त बैठकीचे अधिकृत पत्र समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द केले.प्रशासनाकडून चर्चेचे निमंत्रण मिळाल्याने ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, या अपेक्षेने समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने बैठक
ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी पुढाकार घेतला होता. शेतकरी आणि साखर कारखानदारांची संयुक्त बैठक घेऊन ऊसदराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत शेतकऱ्यांची ३९०० रुपये पहिली उचल आणि प्रतिटन ४२०० रुपये अंतिम दराची मागणी मान्य होणार का, याकडे संपूर्ण मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली. यावेळी भाऊसाहेब शेळके, विनोद काळे, देविदास पाठे, संपत रोडगे, उद्धव काळे, गजानन गायकवाड, सुनील निरपळ, नारायण काळे, अमोल वायसळ, संभाजी निरपळ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

















