कोल्हापूर : चंदगड तालुक्यात सध्या ऊस गळीत हंगामाला वेग आला आहे. या अंतर्गत ऊस वाहतुकीदरम्यान रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसलेली वाहने अपघातांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे प्रत्येक ट्रॅक्टर-ट्रॉली आणि अन्य वाहनांवर आवश्यक रिफ्लेक्टर असणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रिफ्लेक्टरअभावी अपघात झाल्यास परिस्थिती व पुराव्यांच्या आधारे वाहनचालकासह संबंधित साखर कारखान्याच्या जबाबदार शेती अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रकच्या अपघातांमध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी चंदगड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
वाहतूक पोलिस वाहनांची तपासणी करून रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर जागेवरच रिफ्लेक्टर बसविण्यासह कारवाई करत आहेत. तसेच मोठ्या आवाजातील डीजे, टेंपर रेकॉर्डर आणि साउंड सिस्टीमचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली जात आहे. अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ते होण्यापूर्वीच रोखणे हे पोलिसांचे प्राधान्य असून, ऊस वाहतूकदार, कारखाने आणि वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन चंदगड पोलिसांनी केले आहे. कारखान्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना रिफ्लेक्टर बसवावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

















