पुणे : चालू गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असतानाही नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने अद्याप पहिल्या उचलीची घोषणा केलेली नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी कोणाचीही वाट न पाहता प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल देण्याचे मान्य केले असताना नीरा-भीमा कारखान्याने मात्र अद्याप दर जाहीर केलेला नाही. कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी किमान ३,५०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. या मागण्यांबाबत समितीने कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास धरणे आंदोलनीचा इशाराही समितीने दिला आहे.
समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने गेल्यावर्षी २०२५-२६्च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाचे किमान २५० रुपये प्रतिटन ऊसबिल तातडीने अदा करून अंतिम ऊसदर ३,३५० रुपये प्रतिटन निश्चित करावा अशी आमची मुख्य मागणी आहे. समितीचे कार्याध्यक्ष महादेव घाडगे यांनी सांगितले की, शेजारच्या तालुक्यांमधील आमि जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा चारशे ते पाचशे रुपये अधिक देत गतवर्षीच्या उसाला प्रतिटन ३,७०० रुपयांपर्यंत अंतिम दर दिला. आपल्या कारखान्याची उपपदार्थ निर्मिती आणि त्यातून मिळणारे उत्पन्न विचारात घेता, शेतकऱ्यांना प्रतिटन ३,५०० रुपये दर देणे शक्य आहे. मात्र, कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून आम्ही किमान ३,३५० रुपये अंतिम दराची मागणी केली आहे. कारखान्याने चालू हंगामातील उसासाठी किमान ३ हजार ५०० रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, अशी मागणी समितीचे सचिव अजित टिळेकर यांनी केली. याप्रश्नी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

















