होर्मुझ सामुद्रधुनीबाबत पुन्हा खुली करण्याबाबत चर्चा सुरू असली तरी जागतिक तेल पुरवठ्याचे धोके कायम : हरदीप पुरी

नवी दिल्ली : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत चर्चा सुरू असतानाच तांबड्या समुद्रातील तणाव कायम असल्याने जागतिक तेल पुरवठ्याला अजूनही धोका असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी सांगितले.नवी दिल्ली येथे फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि वार्षिक अधिवेशनाला संबोधित केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पुरी म्हणाले, “आपण अजूनही संकटातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही.” होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत अमेरिका, इराण आणि आखाती देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तेलाच्या मुक्त वाहतुकीतील अडथळे दूर होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

“चर्चा सुरू आहे. त्यामुळे आम्हाला सकारात्मक संकेत मिळत आहेत,” असे पुरी म्हणाले. या संकटाच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 67 ते 68 डॉलरवरून जवळपास 120 डॉलरपर्यंत वाढल्या होत्या. सध्या त्या सुमारे 92 डॉलर प्रति बॅरल असल्याचे त्यांनी सांगितले.अधिवेशनातील भाषणात पुरी यांनी पश्चिम आशियातील लष्करी तणाव वाढला तरी भारतातील देशांतर्गत इंधन पुरवठा सुरळीत ठेवता येईल, असा विश्वास व्यक्त केला. या संकटाच्या काळात देशातील सुमारे 1.07 लाख इंधन विक्री केंद्रांपैकी एकाही केंद्रावर इंधन संपले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel

28 फेब्रुवारी रोजी होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाल्यानंतर भारतासाठी स्वयंपाकाच्या गॅसचा (LPG) पुरवठा हा विशेष चिंतेचा विषय बनला होता. कतार, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया हे भारताचे प्रमुख LPG पुरवठादार देश आहेत.11 मार्च रोजी झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारत आपल्या एकूण LPG वापरापैकी सुमारे 60 टक्के LPG आयात करतो. या आयातीपैकी जवळपास 90 टक्के LPG होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारतात येतो.

पुरी यांनी सांगितले की, सरकारने सरकारी तेल विपणन कंपन्यांसोबत दररोज बैठका घेतल्या. तसेच देशांतर्गत LPG उत्पादन वाढवण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी रिफायनरी कंपन्यांसोबत काम केले.या प्रयत्नांमुळे दररोजचे LPG उत्पादन सुमारे 35 हजार टनांवरून 55 हजार टनांपर्यंत वाढले. संभाव्य टंचाईच्या भीतीमुळे LPG सिलिंडरच्या दैनंदिन बुकिंगमध्येही वाढ झाली. ही बुकिंग सुमारे 52 लाखांवरून 92 लाखांपर्यंत पोहोचली होती, असे त्यांनी सांगितले.

तेल कंपन्यांच्या नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू

तेल विपणन कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता पुरी म्हणाले की, इंधन विक्रीत या कंपन्यांना अजूनही आर्थिक तूट सहन करावी लागत आहे. नुकसानभरपाईबाबतची प्रक्रिया ही “सतत सुरू असलेली प्रक्रिया” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच भारतीय खलाशांची सुरक्षा सरकारसाठी “अत्यंत उच्च प्राधान्याचा” विषय असल्याचेही पुरी यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here