भारती एनर्जी अँड शुगर्सच्या पहिल्या गाळप हंगामाला प्रारंभ; प्रतिटन ३,८०० रुपये दर देणार : ऋषिकेश लाड यांची घोषणा

सांगली : तुरची येथील भारती एनर्जी अँड शुगर्स हा तासगाव आणि पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना असून, भविष्यात शेतकऱ्यांना उच्चांकी ऊसदर देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष महेंद्र लाड यांनी केले. भारती एनर्जी अँड शुगर्सच्या पहिल्या गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, रोहन लाड, शिवाजीराव वाघ, सोनहिरा कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एफ. कदम आणि राजेंद्र लाड यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.

महेंद्र लाड म्हणाले, भारती एनर्जी हा तासगाव आणि पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना आहे. दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी नेहमी लोकांचा विश्वास जपण्याची शिकवण दिली. त्याच विचाराने कारखान्याचे कामकाज केले जाईल. जिल्हा बँक आणि उद्योग यांच्यात योग्य समन्वय साधून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. आगामी दोन वर्षांत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री कारखान्यात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

खासदार विशाल पाटील म्हणाले, दिवंगत दिनकरआबांनी मोठा संघर्ष करून या कारखान्याची उभारणी केली आहे. त्यामुळे हा कारखाना व्यवस्थित सुरू राहणे आवश्यक आहे. सध्या साखर उद्योग अनेक आर्थिक अडचणींमधून जात असून, कारखान्याचे कामकाज आर्थिक शिस्तीत चालविणे गरजेचे आहे. भारती ग्रुपकडून ही शिस्त निश्चितपणे राखली जाईल, असा विश्वास आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून ऊस शेतीमध्ये ठिबक सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी महेंद्र लाड यांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

माजी खासदार संजय पाटील म्हणाले, यापूर्वी आम्हीही हा कारखाना सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र जुनी यंत्रसामग्री आणि आर्थिक अडचणींमुळे अपेक्षित यश मिळाले नाही. महेंद्र लाड यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याला निश्चितच चांगले दिवस येतील. या कारखान्याशी परिसरातील शेतकऱ्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा. कारखान्याकडून चांगला दर दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चांगल्या व्यक्तींच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड म्हणाले, नफा-तोट्याचा विचार न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी यंदाचा गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाना नव्याने सुरू होत असला तरी नागेवाडी आणि श्रीपती कारखान्यांच्या धर्तीवर उसाला प्रतिटन ३,८०० रुपये दर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारखान्याचे कामकाज काटकसरीने आणि आर्थिक शिस्तीत चालविले जाईल. आगामी दोन वर्षे शेतकऱ्यांनी कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डी. ए. माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ, सोनहिरा कारखान्याचे कार्यकारी अधिकारी एच. एफ. कदम, राजेंद्र लाड, रोहन लाड, अमित पाटील, सतीश सावंत, महेश हिंगमिरे, विनय शेटे, श्रीकांत लाड, जे. के. बापू जाधव, पांडुरंग संकपाळ, सुरेश भाऊ पाटील, संजय पाटील, वैभव उगळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते. राजू खारगे यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here