कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४,२०० रुपये दर जाहीर केला आहे. यामध्ये पहिल्या हप्त्यापोटी ३,९०० रुपये, गळीत हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि त्यानंतर उर्वरित २०० रुपये अदा करण्यात येणार आहेत. यंदा ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुंभार म्हणाले, दालमिया कंपनीने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, शेतकऱ्यांना चांगला आणि समाधानकारक ऊसदर देण्याची परंपरा कायम राखली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा ऊस पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन उन्हाळ्यात उसाचे पीक टिकविण्यासाठी कृषितज्ज्ञांच्या माध्यमातून थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय पाणी व्यवस्थापनाबाबत विशेष मार्गदर्शन केले जाणार असून, पाचट व्यवस्थापनासाठी कारखान्याच्या वतीने अनुदान दिले जाणार आहे. खोडवा पिकातील नांग्या भरण्यासाठी ऊस रोपेही अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कमी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा ऊस उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कारखान्याने १४ नोव्हेंबरपर्यंत गाळपासाठी आलेल्या उसाची बिले संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. यापुढेही गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल दर मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस दालमिया कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन संतोष कुंभार यांनी केले.यावेळी कारखान्याचे एचआर प्रमुख सुहास गुडाळे, शेती अधिकारी संग्राम पाटील, सहाय्यक शेती अधिकारी शिवप्रसाद देसाई, शिवप्रसाद पडवळ, चिंतामणी पाटील आदी उपस्थित होते.

















