सांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या श्री दत्त इंडिया कंपनीने गेल्या हंगामात एकरकमी प्रतिटन ३,४०० रुपये दर दिला होता. यंदा त्यात ६१० रुपयांची वाढ केली आहे. मागील नऊ वर्षांत कारखान्याने ८० लाख टन उसाचे गाळप केले आहे. शेतकऱ्यांची बिले वेळेत दिली आहेत. यंदा आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत २९ दिवसांत १ लाख ८९ हजार २०० टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्याने उसाला प्रतिटन ४ हजार १० रुपये दर जाहीर घोषित केला आहे अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी दिली. दरम्यान, यंदा सांगली जिल्ह्यातील १६ पैकी १३ साखर कारखान्यांनी यंदाचे ऊसदर जाहीर केले आहेत. बहुतांश कारखान्यांचे दर प्रतिटन ३ हजार ८०० ते ४ हजार १० रुपये असे आहेत. सध्या ‘राजारामबापू’च्या जत युनिट, सद्गुरू, राजेवाडी व उदगिर, बामणी या कारखान्यांनी दर जाहीर केलेले नाहीत.
उपाध्यक्ष शिंदे म्हणाले की, कारखान्याने यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी बाहेर वजन करून आणलेला ऊस स्वीकारला जाणार आहे. कारखाना चालविण्याचा कंपनीचा हा शेवटचा हंगाम आहे. त्यामुळे कंपनीच्या अध्यक्षा प्रीती रुपारेल, तज्ज्ञ संचालक जितेंद्र धारू यांच्याशी चर्चा करून एकरकमी ऊस दर देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यात सहवीज निर्मिती, इथेनॉल किंवा अन्य उपपदार्थांची निर्मिती होत नसतानाही प्रतिटन ४,०१० रुपये दर दिला जाईल. राज्यातील सर्वाधिक दरांपैकी हा एक असल्याचा दावा आहे. सध्या कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.१० टक्के असून जिल्हा बँकेला प्रतिटन २६१ रुपये भाडे दिले जाते. यावेळी व्यवस्थापक शरद मोरे, कृषी अधिकारी मोहन पवार, दीपक शिंदे उपस्थित होते.

















