सातारा : मागील चार वर्षांपासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करताना आम्ही किसन वीर व खंडाळा या दोन्ही साखर कारखान्यांचा कारभार अतिशय पारदर्शक व शेतकरी हिताय केला आहे. सभासदांनीच आपला कारखाना वाचविला. त्यामुळेच आपण गळीत हंगामाची सुरुवात करू शकलो. दिवंगत अजित पवार यांच्यामुळे किसन वीर व खंडाळा कारखान्याला नवसंजीवनी मिळाली. कारखाना सक्षमतेने चालविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. ऊस उत्पादकांनीही आपल्या ऊसबिलाबाबत साशंकता बाळगू नये, दोन्ही कारखान्यांकडे गळीत हंगाम २०२६- २७ मध्ये गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन तीन हजार ८०० रुपये दर देण्यात येणार असल्याची माहिती माहिती मदत व पुनर्वसनमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी दिली.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये अध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे की, किसन वीर व खंडाळा कारखान्याचे गाळप हे पूर्ण क्षमतेने सुरू असून, को-जन व डिस्टिलरी प्रकल्पही सुस्थितीत सुरू आहेत. किसन वीर कारखान्याचे २५ दिवसांमध्ये एक लाख, तर खंडाळा कारखान्याचे ३३ दिवसांमध्ये ९९ हजार गाळप झालेले आहे. ऊसबिल वेळेवर देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. मागील संचालक मंडळाच्या काळातील शेतकऱ्यांची थकीत ६४ कोटींचे ऊसबिल ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेली होती. हक्काचा सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शेतकऱ्यांनी साथ दिली आहे. आता २०२६-२७ चा गळीत हंगाम शेतकरी व कामगारांच्या विश्वासाच्या जोरावरच गाळपाचे जे उद्दिष्ट संचालक मंडळाने डोळ्यासमोर ठेवलेले आहे, ते पूर्ण करणार आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गळितासाठी देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही मंत्री पाटील, खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक उत्तम पाटील व संचालक मंडळाने केले.

















