बीड : मराठवाड्यातील कारखान्यांनीही ४२०० रुपये ऊस दर देण्याच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’चे चक्काजाम आंदोलन

बीड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे, बीड जिल्हाध्यक्ष राजू गायके, जिल्हाध्यक्ष दिनकर रिंगणे व उपजिल्हाध्यक्ष शेख खिजर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला प्रतिटन किमान ४,२०० रुपये अंतिम दर व ३,९०० रुपये पहिली उचल मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी आगामी काळात आक्रमक आंदोलन झाले. दरम्यान, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २७ नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व संघटना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

आंदोलनात कारखानदारांनी तत्काळ दर जाहीर करणे, वजनकाटे ऑनलाइन करणे, साखरेला प्रतिकिलो ५० रुपये व इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर, वाढीव साखर दरात शेतकऱ्यांना ७० टक्के वाटा, हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत छत्रपती संभाजीनगरच्या साखर संकुलाचे प्रादेशिक सहसंचालक सु. शं. सुपेकर, गेवराईचे तहसीलदार, गेवराई ग्रामीणचे पोलिस निरीक्षक आणि ग्राम महसूल अधिकारी जगदीश सोळशे यांनी आंदोलनस्थळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बैठक घेण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात नारायण करपे, जयदेव शिंगणे, बाळासाहेब डहाळे, डॉ. गणेश ढवळे, राजेंद्र आमटे, श्रीनिवास भोसले आदी सहभागी झाले होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here