तेहरान : इराणच्या संवर्धित युरेनियमच्या साठ्यावरून मतभेद निर्माण झाल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा ठप्प झाली आहे. मध्यस्थांनी इशारा दिला आहे की, मध्यपूर्वेत पुन्हा लष्करी संघर्ष भडकणार नाही, याची हमी ते देऊ शकत नाहीत. ‘अल अरेबिया इंग्लिश’ने एका वरिष्ठ सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने इराणकडे स्पष्ट कृती आराखडा आणि लेखी हमी मागितली आहे. इराणने आपला संवर्धित युरेनियमचा साठा संपवावा आणि भविष्यात पुन्हा युरेनियम संवर्धन सुरू करणार नाही, असे आश्वासन द्यावे, अशी अमेरिकेची भूमिका आहे.
मतभेद दूर करण्यासाठी मध्यस्थांनी अनेक प्रस्ताव मांडले असले, तरी दोन्ही देश आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे वृत्तात म्हटले आहे.वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील तणाव कायम असतानाच हा राजनैतिक पेच निर्माण झाला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या भवितव्याबाबत अद्याप दोन्ही देशांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही.
केवळ तणाव संपवण्यासाठी करार करण्यास इराणचा नकार
यापूर्वी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले होते की, सध्याचा राजनैतिक पेच संपवण्यासाठीच अमेरिका-इराण करार स्वीकारला जाणार नाही. कोणत्याही करारात इराणच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण आणि भविष्यात पुन्हा लष्करी संघर्ष होणार नाही, याची खात्री असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अल जझीराच्या वृत्तानुसार, इराणच्या सरकारी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अराघची म्हणाले की, इराणला चांगला, सन्मानजनक आणि दीर्घकाळ टिकणारा करार हवा आहे. ‘ना युद्ध, ना शांतता’ अशा परिस्थितीत इराणला राहायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेसोबत होऊ शकणाऱ्या संभाव्य कराराच्या टिकाऊपणावर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, “आज करार करून काय उपयोग, जर दोन महिन्यांनंतर त्याचे उल्लंघन झाले आणि पुन्हा युद्ध सुरू झाले?” जूनमध्ये झालेल्या युद्धविराम करारानंतर अवघ्या 15 दिवसांत पुन्हा संघर्ष सुरू झाल्याची आठवणअराघची यांनी करून दिली. केवळ सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी इराण कोणताही करार स्वीकारणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
60 टक्के संवर्धित युरेनियमच्या साठ्यावर चर्चेस इराण तयार
अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर बोलताना अराघची म्हणाले की, 60 टक्के संवर्धित युरेनियमच्या साठ्याबाबत चर्चा करण्यास इराण तयार आहे. मात्र, हा साठा देशाबाहेर पाठवण्यास तेहरानची तयारी नाही.युरेनियम संवर्धनाबाबत न्याय्य तोडगा काढता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, हा तोडगा व्यापक कराराचा भाग असावा आणि त्यात इराणचे राष्ट्रीय हित तसेच सुरक्षाविषयक चिंता विचारात घेतल्या जाव्यात, अशी अट त्यांनी मांडली.अराघची यांनी असेही स्पष्ट केले की, कतार आणि पाकिस्तानसह मध्यस्थ देशांच्या माध्यमातून तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात संदेश आणि प्रस्तावांची देवाणघेवाण सुरू आहे.”आम्ही राजनैतिक मार्गावर विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि आम्हाला अजूनही कूटनीतीकडून आशा आहे,” असे ते म्हणाले.
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यास इराण तयार
दरम्यान, अमेरिकेने आपल्या अटी पूर्ण केल्यास होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यास इराण तयार असल्याचे अराघची यांनी सांगितले.कोणत्याही राजनैतिक तोडग्यात इराणचा अणुकार्यक्रम, आर्थिक निर्बंध आणि सुरक्षाविषयक चिंता या मुद्द्यांचा समावेश असणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी पुन्हा मांडली.















