शिलाँग : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) संस्थांनी आणि कृषी विद्यापीठांनी १९ नोव्हेंबर रोजी मेघालयात भातशेतीनंतर पडीक राहणाऱ्या जमिनीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी विशेष कार्यक्रम सुरू केला. उमियाम येथील ICAR संशोधन संकुलात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ICAR च्या विविध संस्था, आसाम कृषी विद्यापीठ, केंद्रीय कृषी विद्यापीठ तसेच ईशान्येकडील राज्यांच्या कृषी विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ईशान्येकडील राज्यांमधील अतिरिक्त महासंचालक, ९० कृषी विज्ञान केंद्रांचे (KVK) प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांसह ३०० हून अधिक सहभागी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. भातशेतीनंतर पडीक राहणाऱ्या ५२,७०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला आणि बटाट्याची लागवड करण्याच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात येत आहे.
“या उपक्रमामुळे संपूर्ण प्रदेशात तेलबिया, कडधान्ये, मका आणि भाजीपाल्याचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. पीक तीव्रता आणि जमिनीचा कार्यक्षम वापर सुधारणे, अन्न व पोषण सुरक्षा बळकट करणे, शेती पद्धतींमध्ये विविधता आणणे तसेच भातशेतीनंतर पडीक राहणाऱ्या क्षेत्रांचा शाश्वत वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उत्पन्न वाढवणे, ही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत,” असे ICAR च्या निवेदनात म्हटले आहे.
ईशान्य परिषदचे सचिव सतींद्र कुमार भल्ला यांनी बियाणे, पेरणी, विक्री आणि सहाय्य (4S) या बाबींवर भर दिला. उमियाम येथील ICAR चे संचालक गोविंदसामी कादिरवेल यांनी बियाणे उत्पादन आणि प्रसार व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकारच्या हस्तक्षेपाची गरज व्यक्त केली. तसेच कडधान्ये, तेलबिया, मांस, मासे आणि अंडी यांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
“शेतकऱ्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी आणि सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नियमित प्रशिक्षण, जनजागृती आणि क्षमता-विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून तांत्रिक हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. विशेषतः बियाणे आणि खतांसारख्या महत्त्वाच्या निविष्ठांचा वेळेवर पुरवठा आणि उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे,” असे ICAR ने नमूद केले.या उपक्रमांतर्गत कडधान्ये आणि तेलबियांसाठी बाजारपेठेशी जोडणी तसेच प्रक्रिया सुविधांच्या विकासावरही विशेष भर दिला जाणार आहे.


















