सोलापूर : गेल्या तीन दिवसांपासून पिलीव येथे राजेवाडी येथील श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याची उसाची वाहने ऊसदराच्या मागणीसाठी अडवून ठेवण्यात आली होती. कारखाना प्रशासन आणि शेतकरी संघटनेतील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरत होत्या. मात्र, गुरुवारी सकाळी दराबाबत तोडगा निघाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनात तिसऱ्या दिवशी यशस्वी तोडगा निघाला. शेतकऱ्यांना पहिली उचल ३,४०० रुपये, तर दुसरा हप्ता १०० रुपये देण्याचे निश्चित झाले आहे. तसेच, साखरेच्या दरानुसार पुढील हप्ता देण्यावरही एकमत झाल्याची माहिती कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील यांनी दिली.
तोडगा जाहीर होताच पिलीव परिसरातील शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे राजेवाडी येथील श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याने ऊस दर जाहीर करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. त्यानंतर तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासन, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ऊसदरावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर, शिवप्रसाद पुकळे, प्रा. संजय पाटील, महावीर धायगुडे, जितेंद्र पाटील, अर्जुन वाघ, अज्ञान पाटील, शिवराज पुकळे, भीमराव कपने, भजनदास चोरमले, लहु पाटील, शामराव मदने, विठ्ठल मदने, कारखान्याच्या संचालिका ऊषा मारकड, अधिकारी क्षीरसागर, शहाजी वाघ, सुभाष जाधव, विजय मदने, नबाजी मदने, आरिफखान पठाण आदी उपस्थित होते.


















