छत्रपती संभाजीनगर : ऊसदरासाठी शेतकरी आक्रमक; प्रतिटन ३,९०० रुपये पहिल्या उचलीची मागणी, बारामती ॲग्रोकडून ३,३११ रुपये दर जाहीर

छत्रपती संभाजीनगर : ऊसाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी (दि. २२) धुळे-सोलापूर महामार्गावरील पाणपोई फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली, तसेच साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांवर गेल्यास अतिरिक्त १०० रुपये आणि पुढील गाळप हंगामात आणखी २०० रुपये देऊन एकूण प्रतिटन ४,२०० रुपये दर द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात महिला शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकांना जाण्यासाठी आंदोलकांकडून रस्ता मोकळा करून दिला जात होता. मात्र, वाहनचालक आणि आंदोलकांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग घडले. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. याचा सर्वाधिक फटका बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला.दरम्यान, दुपारी ३.३० वाजता बारामती अॅग्रो आणि कन्नड प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३,९५१ रुपये पहिली उचल जाहीर केल्याची माहिती आंदोलकांनी दिली. तसेच नंदुरबार येथील एका साखर कारखान्याने प्रतिटन ३,४१० रुपये दर जाहीर केला असताना कन्नड येथील बारामती ॲग्रोला वाढीव दर देण्यात काय अडचण आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब थोरात, कृष्णा साबळे, उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख संजय मोटे, अण्णासाहेब शिंदे, दिलीप मुठे, प्रकाश बोरसे, शिवाजीराव बचाटे, राजू बोंगाणे, दीपक शेजवळ, सुनील बोडखे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

अंबादास दानवे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

दरम्यान, कन्नड येथील उद्धवसेनेची आढावा बैठक संपल्यानंतर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनात सहभाग घेत बारामती ॲग्रोचे अध्यक्ष तथा आमदार रोहित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.या चर्चेनंतर बारामती ॲग्रोने शेतकऱ्यांसाठी प्रतिटन ३,३११ रुपये पहिली उचल जाहीर केली. त्यानंतर अंबादास दानवे यांच्या मध्यस्थीने सायंकाळी ४.३० वाजता सुमारे साडेचार तासांपासून सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here