नाशिक: यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी ३,२०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय कादवा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला आहे. यंदा शासनाने साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नेहमीपेक्षा एक महिना अगोदर सुरू केल्याने सुरुवातीच्या काळात उसाची रिकव्हरी कमी होती. त्यामुळे बँकेकडून मिळणारी आर्थिक उचलही मर्यादित होती. परिणामी सुरुवातीला ३००० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्यात आली. आता रिकव्हरीत वाढ झाल्याने आणि बँकेकडून आर्थिक उपलब्धतेमुळे ३,२०० रुपये उचल देण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली. लवकरच ही रक्कम सेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होईल, असे शेटे यांनी स्पष्ट केले.
ऊस उत्पादक शेतकरी तसेच शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी कार्यक्षेत्रातील कारखान्यावर भेट देऊन चेअरमन श्रीराम शेटे यांच्याशी चर्चा केली करून निवेदन दिले होते. शेतकऱ्यांनी ३००० रुपयांऐवजी पहिली उचल ३२०० रुपये प्रतिटन देण्याची मागणी केली होती, शेटे यांनी कारखान्याची आर्थिक परिस्थिती त्यांच्यासमोर स्पष्ट केली. त्यानंतर आता बँकेकडून आर्थिक उपलब्धता होताच ३२०० रुपये प्रतिटन पहिली उचल अदा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कारखाना जिल्ह्यात उसाला सर्वाधिक भाव देतो. यापुढेही ही परंपरा कायम राहील. शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेऊ नये. ‘ऊस वेळेत तोडला जावा, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सर्वांनी कादवा कारखान्याला ऊस पुरवठा करावा, असे आवाहन शेटे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.


















