कर्नाटक : सीमाभागात ऊस मिळविण्यासाठी साखर कारखान्यांमध्ये लागली स्पर्धा, तोडणी यंत्रांचा धडाका

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील उसासाठी कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेमुळे ऊस तोडणी आणि वाहतुकीला वेग आला आहे. शेतकऱ्यांना अनेक कारखान्यांचे पर्याय उपलब्ध झाल्याने कोणत्या कारखान्याला ऊस पाठवायचा, याबाबत चर्चा सुरू आहे. ऊस तोडणीची वेळ, वाहतूक खर्च, प्रतिटन दर, वजनातील पारदर्शकता आणि वेळेवर होणारे पेमेंट या बाबींना शेतकरी प्राधान्य देत आहेत. केवळ ऊस लवकर नेण्याची स्पर्धा न करता शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या ऊस तोडणी मशीनला यंदा चांगली मागणी आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळीही मशीनच्या साहाय्याने तोडणी सुरू आहे. आमच्या उसाला कोणता कारखाना चांगला दर देतो, वाहतूक खर्च किती लागतो आणि बिल किती दिवसांत मिळते, याचा विचार करूनच ऊस पाठवण्याचा निर्णय घेत आहोत, असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक आणि अन्य वाहनांची दिवसरात्र ये-जा सुरू असल्याने वाहतूकदारांनाही कामाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सीमाभागात शेतकऱ्यांचा ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू झाली आहे. कार्यक्षेत्राबाहेरील जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी मिळवण्याच्या स्पर्धेत कारखान्यांनी वाहतूक, तोडणी यंत्रणाही गतिमान केली आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये रात्रंदिवस ऊस तोडणी मशीनचा आवाज घुमत आहे. या स्पर्धेतून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर, वेळेत ऊस तोडणी होवून विनाविलंब ऊस बिल मिळणार का?, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. याबाबत ऊस तोडणी मशीनमालक राजगोंडा पाटील म्हणाले की, कारखान्यांकडून जास्तीत जास्त ऊस तोडण्याचे नियोजन असल्याने दिवसा-रात्री मशीन सुरू ठेवाव्या लागत आहेत. मशीनची देखभाल, डिझेल आणि चालकांचा खर्च मोठा असला तरी हंगामात जास्तीत जास्त काम करण्यावर भर आहे. कोगनोळीतील शेतकरी बाळासाहेब बाळीकाई यांनी सांगितले की, कारखान्यांनी केवळ ऊस नेण्याची घाई न करता योग्य दर द्यावा. ऊस वेळेत तोडला जावा आणि बिलही वेळेत मिळावे, एवढीच आमची अपेक्षा आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here