अहिल्यानगर : ऊसदराच्या प्रश्नावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. शेतकरी संघटनांनी एकजूट दाखवत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढल्यानंतर प्रशासनाने ऊसतोड आणि गाळपाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. उद्या (मंगळवार) सकाळी १० वाजेपर्यंत तोडलेल्या उसाचे गाळप पूर्ण करावे आणि त्यानंतर ऊसतोड थांबवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
ऊसदर निश्चित करण्यासाठी २६ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांना ३ हजार ७०० रुपयांची पहिली उचल जाहीर न केल्यास २८ तारखेपासून जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे.
शेतकरी संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप उसाची पहिली उचल जाहीर न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
या मोर्चात खासदार नीलेश लंके, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह अनेक शेतकरी नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
राजू शेट्टी यांनी नेमका काय दिला इशारा?
अहिल्यानगर जिल्ह्याचा साखर उतारा सव्वा अकराच्या पुढे असल्याने शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून चार हजार रुपये देणे शक्य असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या ऊसतोड बंदीच्या आदेशाचे वाहतूकदारांनी पालन केले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
२६ तारखेच्या बैठकीत कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दर जाहीर केला नाही, तर २८ तारखेपासून जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवर आंदोलक ठिय्या आंदोलन करतील. गरज पडल्यास रेल रोको आंदोलनही छेडण्यात येईल, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.खासदार नीलेश लंके, आमदार विठ्ठलराव लंघे आणि आमदार अमोल खताळ यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नेमके काय?
अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी ऊसदर निश्चितीच्या बैठकीसंदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
- २६ तारखेला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसदर निश्चितीची बैठक होणार आहे.
- या बैठकीला सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- कारखान्यांचे एमडी किंवा इतर प्रतिनिधींना पाठवून चालणार नाही.
- तोडलेल्या उसाचे गाळप उद्या सकाळी १० वाजेपर्यंतच पूर्ण करावे.
- बैठकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
‘३,७०० रुपये पहिली उचल देणे अशक्य नाही’
राजू शेट्टी यांनी कारखानदारांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना ३ हजार ७०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी रास्त असून, साखरेचे दर वाढत असल्याने कारखान्यांना हा दर देणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “३ हजार ७०० रुपये हा काही फार मोठा दर नाही. साखरेचे भाव वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हा दर देणे शक्य आहे. आम्ही मागील हंगामातील फरकाची रक्कमही मागितलेली नाही. त्याचा हिशेब करायचा म्हटले तर वेगळाच विषय होईल.”तसेच शेतकऱ्यांनी उसाचे वजन करूनच ऊस गाळपासाठी पाठवावा. असे केल्यास कारखान्यांकडून होणारी काटामारी रोखण्यास मदत होईल, असे आवाहनही त्यांनी केले.
२६ तारखेच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
ऊसदराचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, २६ तारखेला होणाऱ्या बैठकीत कारखानदार कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ३ हजार ७०० रुपयांची पहिली उचल जाहीर न झाल्यास २८ तारखेपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

















