सांगली : ऊसदराच्या प्रश्नावरून राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शकुंतलानगर-ईश्वरपूर येथील एन. डी. पाटील शुगर्सने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक पहिली उचल जाहीर केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील आणि संचालक केदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
ऊसदराच्या लढ्याला यश; शेतकऱ्यांना दिलासा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत ऊसदराची लढाई उभारली होती. या आंदोलनामुळे ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आला होता.दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये ऊसदराच्या प्रश्नावर चर्चा झाली. या चर्चेतून दराबाबत तोडगा काढण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यात ३,९०० रुपये पहिली उचल
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रतिटन ३ हजार ९०० रुपये पहिली उचल देण्याची भूमिका घेतली आहे. याशिवाय कारखाना बंद झाल्यानंतर उर्वरित १०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच साखरेचा दर प्रतिकिलो ४५ रुपयांच्या पुढे गेल्यास आणखी २०० रुपये देण्याची भूमिका कारखानदारांनी मांडली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे.
एन. डी. शुगर्सचा सकारात्मक निर्णय
या पार्श्वभूमीवर एन. डी. पाटील शुगर्सने सांगली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखाना व्यवस्थापनाने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वागत केले. तसेच कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील आणि संचालक केदार पाटील यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, शिवाजीराव पाटील, प्रताप पाटील, दत्तात्रय जाधव, प्रदीप पाटील, आकाश साळुंखे, अनिल करळे, पंडित सपकाळ, साहेबराव पाटील, उत्तम पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.एन. डी. पाटील शुगर्सने जाहीर केलेल्या ४ हजार रुपये पहिल्या उचलीमुळे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, इतर साखर कारखाने आता कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

















