छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील गेल्या तब्बल १५ वर्षांपासून बंद असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना अखेर पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. कारखान्याला साखर आयुक्तालयाकडून ऊस गाळपाचा परवाना मिळाला असून, यंदाच्या हंगामात कारखान्याचे धुराडे पुन्हा पेटणार आहे.पहिल्या टप्प्यात ५० हजार मेट्रिक टन उसाचे चाचणी गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १५ ते २० डिसेंबरदरम्यान कारखाना सुरू करण्याचे उद्दिष्ट असून, जानेवारीअखेरपर्यंत गाळप सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे दीड दशकापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१९८९ मध्ये स्थापना, २०११ पासून कारखाना बंद
देवगिरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना १७ फेब्रुवारी १९८९ रोजी झाली होती. १९९२-९३ मध्ये कारखान्याचा पहिला गाळप हंगाम सुरू झाला. सुरुवातीला परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना महत्त्वाचा आधार ठरला. मात्र, कालांतराने आर्थिक अडचणी आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे कारखान्याचे कामकाज ठप्प झाले.२०१०-११ हा कारखान्याचा शेवटचा गाळप हंगाम ठरला. त्यानंतर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांना यश आले नाही. आता साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना मिळाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना होणार फायदा
देवगिरी कारखाना सुरू झाल्यानंतर फुलंब्रीसह खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोड तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.या कारखान्यामुळे सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा असून, ६०० हून अधिक जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परिसरातील शेती, वाहतूक आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार अनुराधा चव्हाण यांनी देवगिरी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कारखाना सुरू होण्यास विलंब होत असल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग आला.कारखान्याला कर्जमुक्त करण्यासाठी मालमत्ता विक्रीसह विविध आर्थिक व्यवहार करण्यात आले. फेब्रुवारी २०२६ मध्ये कारखान्याचा बॉयलर पेटवण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष ऊस गाळप सुरू होऊ शकले नव्हते. आता साखर आयुक्तालयाकडून अधिकृत गाळप परवाना मिळाल्याने प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
पहिल्या टप्प्यात ५० हजार टनांचे चाचणी गाळप
कारखाना तब्बल १५ वर्षे बंद असल्याने यंत्रसामग्रीची दुरुस्ती, देखभाल आणि आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. सध्या विद्युत विभागाची कामे अंतिम टप्प्यात आहेत.पहिल्या हंगामात ५० हजार मेट्रिक टन उसाचे चाचणी गाळप करण्यात येणार आहे. याद्वारे कारखान्यातील यंत्रसामग्रीची क्षमता, तांत्रिक व्यवस्था आणि संपूर्ण कामकाजाची चाचणी घेतली जाणार आहे.
‘दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद’
याबाबत आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या, “गेल्या १५ वर्षांपासून कारखाना बंद असल्याने मशिनरी आणि इतर दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यास वेळ लागला. सध्या इलेक्ट्रिकचे काम अंतिम टप्प्यात आहे. १५ ते २० डिसेंबरदरम्यान कारखाना सुरू होईल. मतदारांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद आहे.”देवगिरी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार असल्याने फुलंब्रीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून बंद असलेला कारखाना पुन्हा कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना जवळच ऊस गाळपाची सुविधा मिळण्यासोबतच स्थानिक रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे.

















