छत्रपती संभाजीनगर : गंगापूर कारखान्याच्या ऊस दराचा वाद चिघळला, चेअरमननी पाठवली मानहानीची नोटीस

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस दराचा वाद आता चिघळला आहे. पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ यांनी आक्रमक भूमिका घेत उसाला प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी मागणी लावून धरली. खताळ यांनी मंगळवारी (ता. २४) खते, मजुरी व मशागतीचा वाढता खर्च पाहता ३,५०० रुपयांपेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे सांगत, कारखान्याचे चेअरमन कृष्णा पााटील – डोणगावकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र खताळ यांनी केलेले आरोप खोटे व बदनामीकारक असल्याचे सांगत कारखान्याचे चेअरमन डोणगावकर यांनी त्यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.

गंगापूर कारखाना सध्या ‘जय हिंद शुगर प्रा. लि.’ यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला आहे. कारखान्याने गाळप केलेल्या उसाची बिले संबंधित कंपनीकडून दिली जात असल्याने चेअरमन म्हणून थेट दर जाहीर करण्याचा अधिकार आपणास नाही असे चेअरमन डोणगावकर यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. रिकव्हरी, डिझेल व साखर चोरीचे केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून केवळ राजकीय बदनामीसाठी हे षडयंत्र रचले गेल्यानेच एक कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दरम्यान, कारखान्याच्या चेअरमननी घेतलेल्या या भूमिकेमुळे ऊसदराच्या संघर्षाला कायदेशीर वळण लागले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here