कोल्हापूर : भारतीय साखर आणि जैवऊर्जा उत्पादक संघटनेने (इस्मा) जारी केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, देशातील ऊस लागवडीचे क्षेत्र ३.२ टक्क्यांनी घटून ५५.५३ लाख हेक्टर राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे. देशातील साखर उत्पादनात आगामी २०२६-२७ हंगामात ५.२ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज इस्माने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्पादनातील घसरणीचा देशाच्या एकूण उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्पादन घटल्यास देशातील साखरेचा उपलब्ध साठा, बाजारपेठेतील पुरवठ्यावर दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात साखरेचे दर, निर्यात धोरण, आयातीबाबत केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, जानेवारी २०२७ मध्ये उत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर करणार असल्याचे इस्माने स्पष्ट केले आहे. देशात मागील हंगाात २७९.७१ लाख टन निव्वळ साखर उत्पादन झाले होते. यंदा २६५.२१ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असून, मागील हंगामातील तुलनेत त्यात घट होणार आहे. अहवालानुसार महाराष्ट्रात ८६.८५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असून, मागील हंगामाच्या तुलनेत ते १२.४ टक्क्यांनी कमी असेल. कर्नाटकात ४६.१९ लाख टन उत्पादनाचा अंदाज असून, त्यात ६.८ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. साखर उत्पादनात उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर राहील. तेथे ८८.९६ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेथील उत्पादनात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे. इस्माने यंदाच्या हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी साखर वळविण्याचे प्रमाण गृहीत धरलेले नाही.


















