नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी पेमेंट बँकांसाठी ‘आपल्या ग्राहकाला जाणून घ्या’ (KYC) संदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मनी म्यूल व्यवहार, सायबर माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक आणि दहशतवादी वित्तपुरवठ्याशी संबंधित अत्यंत संशयास्पद व्यवहार व खात्यांची ओळख पटवून त्यांच्यावर निर्बंध घालण्यासाठी एकसमान आणि कालमर्यादित मानक कार्यपद्धती (SOP) लागू करण्यात येणार आहे.नवीन नियम १ जुलै २०२७ पासून लागू होतील. मात्र, एखाद्या बँकेला ही कार्यपद्धती त्यापूर्वी लागू करायची असल्यास तसे करता येईल.
संशयास्पद खात्यांची ओळख पटवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर बंधनकारक
सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे अत्यंत संशयास्पद व्यवहार आणि खात्यांची ओळख पटवण्यासाठी बँकांना योग्य तांत्रिक आणि इतर उपाययोजना कराव्या लागतील. त्याचवेळी, वैध आणि सामान्य खात्यांना चुकीने संशयास्पद ठरवले जाणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल.योग्य उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर बँकांना संशयास्पद व्यवहारातील रक्कम किंवा संबंधित खात्यांमधून पैसे काढण्यावर (डेबिट) निर्बंध घालता येतील. आरबीआय ने स्पष्ट केले आहे की, कोणतीही योग्य तपासणी न करता संपूर्ण खात्यावर सरसकट निर्बंध लावण्याची पद्धत टाळली पाहिजे.
खातेधारकांना निर्बंधामागील कारण सांगणे बंधनकारक
खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध लावल्यानंतर बँकांना ग्राहकांना तातडीने डिजिटल माध्यमातून माहिती द्यावी लागेल. इतर माध्यमांतून ही माहिती पुढील कामकाजाच्या दिवसाच्या अखेरपर्यंत देणे बंधनकारक असेल.या सूचनेमध्ये निर्बंध लावण्याचे कारण, ते हटवण्याची प्रक्रिया आणि संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक नमूद करावा लागेल.ग्राहकांना आपले स्पष्टीकरण आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी सात कॅलेंडर दिवसांची मुदत दिली जाईल. आरबीआयच्या निर्देशानुसार, खातेधारकाकडून मिळालेल्या स्पष्टीकरणाची आणि कागदपत्रांची बँकेने तपासणी करून तातडीने निर्णय घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत स्पष्टीकरण मिळाल्यापासून सात कॅलेंडर दिवसांच्या आत निर्णय घेणे आवश्यक असेल.
३० दिवसांत निर्देश न मिळाल्यास ३१ व्या दिवशी निर्बंध हटवावे लागणार
बँकेच्या तपासणीनंतर खात्यावरील डेबिट निर्बंध हटवता येतील किंवा ते कायम ठेवून संबंधित क्षेत्रातील पोलीस प्राधिकरणाला या प्रकरणाची माहिती देता येईल.मात्र, प्रकरणाची माहिती दिल्यापासून ३० कॅलेंडर दिवसांच्या आत सक्षम प्राधिकरणाकडून निर्बंध कायम ठेवण्याबाबत कोणताही आदेश प्राप्त झाला नाही, तर बँकेला ३१ व्या दिवशी हे निर्बंध हटवावे लागतील. यासाठी संबंधित खात्याची सखोल पडताळणी (Enhanced Due Diligence) करून बँकेचे समाधान होणे आवश्यक आहे.
तक्रार निवारणासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
केंद्रीय बँकेने पेमेंट बँकांना ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. या अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील बँकांच्या वेबसाइटवर आणि सर्व शाखांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करावे लागतील.RBI ने म्हटले आहे की, ग्राहकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिची पोच देणे आणि ३० कॅलेंडर दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करणे आवश्यक आहे.याशिवाय, डेबिट निर्बंध लावण्याची आणि हटवण्याची कारणे, त्यासंबंधीची नोंद तसेच ग्राहक आणि पोलीस प्राधिकरणांशी झालेला पत्रव्यवहार यांची कागदपत्रे बँकांना पाच वर्षांपर्यंत जतन करावी लागतील.















