पुणे : छत्रपती कारखान्याकडून उसाला दिवाळीत २०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची घोषणा

पुणे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. कारखान्याने यापूर्वी ३५०१ रुपये प्रतिटन पहिला हप्ता देण्याचे जाहीर करून ऊस दराची कोंडी फोडली होती. त्यानंतर आता शुक्रवारी (ता. २७) झालेल्या बैठकीमध्ये संचालक मंडळाने चालू हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाला २०० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता देण्याचे जाहीर केले. त्यामुळे सभासद, गेटकेनच्या उसाला ३७०१ रुपये भाव मिळणार आहे. हा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये दिला जाणार आहे. सध्या कारखान्याच्या दोन्ही युनिटची उसाची प्रतिदिन गाळप क्षमता ६५०० टन आहे. मात्र, कारखाना क्षमतेपेक्षा अधिक गाळप करीत आहे. आतापर्यंत ४७ दिवसांमध्ये ३ लाख ८४ हजार ५५ टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत ३ लाख ८६ हजार ६६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर व संचालक मंडळाने सांगितले की, चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या उसाचा दुसरा हप्ता २०० रुपये प्रतिदिन देण्याचे जाहीर केले असून, सभासद व गेटकेनच्या उसाला ३७०१ रुपये प्रतिटन भाव मिळेल. कारखान्याच्या दोन्ही युनिटची उसाची गाळप क्षमता प्रतिदिन ६५०० टन आहे. मात्र गुरुवारी एका दिवसामध्ये ९५६४ टन उसाचे गाळप झाले. गेल्या सहा-सात दिवसांपासून कारखाना प्रतिदिन ९ हजार टना पेक्षा जास्त उसाचे गाळप करीत आहे. साखरेच्या उताऱ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. उतारा ११.०३ टक्क्यांपर्यंत पोचला असून, सरासरी उतारा १०.१७ टक्के झाला आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आतापर्यंत १ कोटी ६८ लाख ४० हजार १०० युनिट विजेची निर्मिती झाली असल्याची माहिती देण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here