धाराशिव : जिल्ह्यात यंदा महिनाभर आधी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला. साखर आयुक्तांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा २० दिवस अगोदर दि. १५ ऑक्टोबरला कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर, नरसिंह (इंदापूर), शिवशक्ती भूम, भैरवनाथ शुगर सोनारी, लोकमंगल शुगर (लोहारा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखाना (धाराशिव), श्री विठ्ठल साई, मुरूम (उमरगा), मांजरा शुगर मंगरूळ, धाराशिव साखर कारखाना चोराखळी, नॅचरल शुगर्स रांजणी, डीडीएनएफए हावरगाव या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर ऊसाचे क्षेत्र आहे. मात्र यंदा कमी पावसामुळे अनेक ठिकाणचा ऊस वाळला असून कमी वजनामुळे रिकव्हरी कमी लागत आहे. तर दुसरीकडे नापिकी उसाचे क्षेत्र वाढले असून एका कारखान्याकडे ऊसाची नोंद असूनही कमी पाण्यामुळे शेतकरी लवकर घालवण्यासाठी इतर कारखान्यांकडे हेलपाटे मारत आहेत.
जिल्ह्यात १३ ऑक्टोबरपासूनच १० साखर कारखाने गाळप करीत आहेत. यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील ऊसाची वाढ खुंटल्याने साखर उताऱ्यात घट झाली आहे. गेल्या ४० दिवसांत १३ लाख ४२ हजार १२० मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून या गाळपातून ११ लाख ६७ हजार ६१५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ७.९ ते सर्वाधिक ९.२४% आहे. मंगरूळ येथील मांजरा शुगर साखर कारखान्यात दिवसरात्र गाळप सुरू आहे. कारखान्याकडून ४ दिवसांत पैसे जमा होत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा त्यांच्याकडे अधिक आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा रिकव्हरी कमी असल्याची माहिती मांजरा शुगर कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी दिली. जिल्ह्यात नॅचरल शुगरने उसाला सर्वाधिक ३,३०० रुपये तर त्यानंतर भैरवनाथ शुगरच्या चारही साखर कारखान्यांनी ३,१०० रुपये दर दिला असून मांजरा शुगर कारखान्याने अवघ्या ३ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हजार रुपयेप्रमाणे ऊसबिल जमा करून यंदाही विश्वासार्हता कायम राखली. मात्र इतर कारखान्यांकडून ऊस बिले देण्याची गती संथ आहे. त्यामुळे ऊस गाळपानंतर ८ दिवसांत पैसे खात्यात जमा करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

















