कोल्हापूर : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील पाच साखर कारखान्याचे प्रमुख आमदार यांना दिल्लीला बोलावले होते. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, जनसुराज्यशक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार विनय कोरे, माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते. यावेळी औद्योगिक वापरासाठी लागणारी साखर आणि नागरिकांसाठी खाण्यासाठी लागणारी साखर यामध्ये दरात तफावत केल्यास साखरेला जादा दर मिळून शेतकऱ्यांचा फायदा होईल, ही अनेक वर्षांची मागणी शाह यांनी मान्य केली. याचा निर्णयही लवकरच घेण्याचे बैठकीत ठरले, अशी माहिती वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
आमदार कोरे म्हणाले की, बैठकीत साखरेची एमएसपी किमान मूल्य जे सध्या ३१ रुपये आहेत ते ४० रुपयांपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच इथेनॉलचा कोटा वाढण्याबरोबर पेट्रोलमध्ये तीस ते पस्तीस टक्के पर्यंतचा वापर करणे, सरकारी तेल कंपन्याकडून किंमत वाढवणे याविषयी चर्चा झाली. बैठकीदरम्यान सहकारी साखर कारखाना अडचणीतील साखर कारखानदारीला गेल्या काही वर्षांपूर्वी सॉफ्ट लोन दिले ते तसे पुन्हा सॉफ्ट लोन देण्याचा निर्णयही झाला. व्याज परतावास योजनेअंतर्गत डिस्टलरी विस्तार वाढ किंवा डिस्टलरीसंदर्भात व्याज पर्तवाचा निपटारा करणे, सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय या महत्त्वाच्या बैठकीत झाले आहेत. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासंदर्भात अनेक विषय मांडले असल्याची माहितीही आमदार कोरे यांनी दिली.


















