अहिल्यानगर : जिल्हा बँकेने १२ सहकारी साखर कारखान्यांना दिले तब्बल २७०० कोटींचे कर्ज

अहिल्यानगर : जिल्हा सहकारी बँकेच्या कारभारात साखर कारखानदारीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. बँकेची दरवर्षीची उलाढाल १२ हजार कोटींच्या पुढे आहे. जिल्ह्यातील ३६०० पेक्षा अधिक संस्था बँकेच्या सभासद असल्या, तरी साखर कारखानेच सर्वात मोठे सभासद असल्याचे पुढे येत आहे. जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांशी संबंधित अथवा त्यांच्या प्रभावाखालील १२ साखर कारखान्यांना तब्बल २७०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या कर्जमुक्ती योजनेच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील साधारणतः सव्वादोन लाख शेतकऱ्यांकडे २४०० कोटींच्या आसपास थकीत कर्ज होते, जे आता माफ होणार आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांकडेच २७०० कोटींचे कर्ज दिसत आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले; मात्र बँकेकडील कर्जावर व्याज सुरूच आहे. याच व्याजातून बँकेची उलाढालही वाढल्याचे दिसते.

जिल्ह्यातील ज्ञानेश्वर सहकारी, मुळा कारखाना, थोरात कारखाना, नागवडे कारखाना, वृद्धेश्वर, सहकारमहर्षी कोल्हे, पद्मश्री विखे, अगस्ती, अशोक, गणेश, कुकडी आणि सहकारमहर्षी काळे या कारखान्यांना जिल्हा बँकेने कर्जे दिली आहेत. साधारणतः २७० कोटी रुपयांपासून ३८ कोटी रुपयांपर्यंतची ही कर्जे आहेत. चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात, अनुराधा राजेंद्र नागवडे, आमदार मोनिका राजळे, आमदार विवेक कोल्हे, डॉ. सुजय विखे पाटील, भानुदास मुरकुटे, आमदार विवेक कोल्हे, राहुल जगताप अशा मातब्बर नेत्यांचे हे कारखाने आहेत. राजकारण, सहकार आणि साखर कारखानदारी यांचे समीकरण पाहता जिल्हा बँकेचे संचालकपद केवळ प्रतिष्ठेचे राहिले नसून, आपल्या कारखान्यांच्या अर्थचक्रासाठी जिल्हा बँकेत ‘संचालक’ असणे ही जणू गरज बनल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून उभी राहिलेली बँक आहे. सहकारी साखर कारखानदारी हीदेखील जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारातील महत्त्वाची घटक ठरली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here