अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर आणि मुळा सहकारी साखर कारखान्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या कार्यालयात दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकांसाठी पहिली संयुक्त बैठक झाली. यावेळी भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही साखर कारखान्यांच्या सर्व गटांतील सभासद पहिल्यांदाच एकत्र आले. आगामी काळात प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी सर्वांची मोट बांधली जाईल. यामध्ये पक्षभेद केला जाणार नाही, अशी घोषणा आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले. तालुक्यातील दोन्ही कारखान्यांना सुमारे पाच दशकांचा इतिहास असतानाही प्रत्येकी ५०० ते ६०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.
दरम्यान, दोन्ही कारखान्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक वर्षे ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक राहिलेले आमदार लंघे आता विरोधी भूमिकेत असून त्यांच्यासोबत पंचगंगा शुगरचे सर्वेसर्वा प्रभाकर शिंदे यांनीही दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत प्रभाकर शिंदे यांनी दोन्ही कारखान्यांच्या विद्यमान व्यवस्थापनावर जोरदार टीका करत कोणत्याही परिस्थितीत निवडणुका बिनविरोध होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. कारखानदार कायम कर्जाचा बोभाटा करतात. मात्र, कारखान्याला झालेला फायदा कधीच सांगत नाहीत. कुठलेही कर्ज घेतल्यानंतर ते फेडले जाते, हे साधे गणित सभासदांना कधी समजावून सांगितले गेले नाही, अशी टीका त्यांनी केली. शंकराव लोखंडे, किसनराव गडाख, भारतीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भाऊसाहेब वाघ, किरण जाधव, बी. डी. मोटे, दिनकरराव गर्जे, मेजर अरुण फाटके, रामभाऊ खंडागळे आदी उपस्थित होते.


















