आंध्र प्रदेश: विजयनगरम जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रात घसरण

विजयनगरम : जिल्ह्यातील दोन साखर कारखाने बंद झाल्यामुळे ऊस शेतीत लक्षणीय घट होईल अशी अपेक्षा आहे. भीमासिंगी सहकारी साखर कारखाना आणि सीतानगरमधील एक खासगी युनिट एनसीएस शुगर्सने सातत्याने तोटा आणि पुरेसा ऊस नसल्याने कामकाज बंद केले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी राजम-पलकोंडा रोडवरील एका खासगी साखर कारखान्यावर अवलंबून आहेत. मात्र, हा कारखाना लांब अंतरावर असल्याने त्यांना प्रचंड वाहतूक शुल्काचे ओझे सहन करावे लागत आहे.

द हिन्दू मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रात सातत्याने घसरण होत आहे. जाणकारांच्या मते ऊस पिक पूर्वी जवळपास २०,००० हेक्टरमध्ये होते. ते २०२२ मध्ये घटून ४,५०५ हेक्टरवर आले आहे. तर २०२३ मधील खरीब हंगामात ते आणखी घसरून ३,५०० हेक्टरवर येईल.

काही वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. कारण, त्यांना भाताच्या माध्यमातून मिळणाऱ्या १२,००० ते १५,००० रुपये प्रती एकरच्या तुलनेत प्रती एकर ३०,००० रुपये मिळत होते. मात्र, ऊस तोडणी तसेच वाहतुकीतील वाढता खर्च आणि प्रक्रिया युनिट बंद झाल्याने ऊसाची मागणी घटली आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा भात पिकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. कारण भीमासिंगी साखर कारखाना बंद झाल्यानंतर आता या पिकासाठी कोणीच खरेदीदार नाही.

जिल्हा संयुक्त कृषी संचालक व्ही. टी. रामाराम यांनी सांगितले की, सरकार कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करून ऊस उत्पादकांना चांगला दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रामाराव यांनी द हिंदूला सांगितले की, जर शेतकरी पिक लागवड क्षेत्रात वाढ करू इच्छित असतील तर या वर्षी त्यांच्या उसाला सर्वोत्तम दर मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
लोक सत्ता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बेसेटी बाबाजी यांनी भीमसिंगी कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी प्रयत्न केले. ते म्हणतात की, सरकारने कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल. अनेक कामगारांनाही आपली नोकरी पुन्हा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here