बीड : ऊस पिकात घेतले बटाटा, कांदा व लसणाचे आंतरपिक, शेतकऱ्याने सुरू केले चिप्सचे उत्पादन

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रात एक आगळावेगळा प्रयोग राबवला. त्यांनी उसाचे मुख्य पीक घेतानाच त्यामध्ये बटाटा, कांदा आणि लसूण अशी मिश्र आंतरपिके घेण्याचे धाडस केले. यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बायोचार, बायोमिक्स आणि प्रोम अशा खतांच्या मिश्रणाने जमिनीचा पोत सुधारला. एकाच मशागतीत आणि एकाच खर्चात सर्व पिकांना पाणी व खत मिळाल्याने उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला. केवळ दोन ते अडीच महिन्यांत या आंतरपिकांमधून त्यांना दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. बटाट्याचा दर कमी झाल्याने आता त्यांनी १५०० किलो बटाट्यांवर स्वतःच प्रक्रिया केली आणि चिप्स तयार केले. त्याला २०० ते २५० रुपये किलो दर मिळत आहे.

देवरवाडे यांनी केवळ ३० गुंठ्यात ३०० किलो लसूण आणि १५०० किलो कांदा पिकवला. शिवाय त्यांना ६ टन बटाट्याचे मोठे उत्पादन मिळाले. मुख्य उसाच्या पिकातून त्यांना ४० टनांचे उत्पादन अपेक्षित असताना, केवळ या आंतरपिकांमधून सर्व खर्च वजा जाता ५० ते ६० हजार रुपयांचा अतिरिक्त नफा मिळणार आहे. दरम्यान, सुरवातीला बाजारात बटाट्याला १२ रुपये घाऊक दर होत. आता आवक वाढल्याने तो ८ रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे त्यांनी शेतातच चिप्स तयार करण्याचा निर्णय घेतला. १५०० किलो बटाटापासून एक क्विंटल चिप्स तयार झाले असून परिसरातील ग्राहक ते आवडीने विकत घेत आहेत. या प्रक्रियेमुळे मालाला सन्मानजनक दर मिळत आहे असे देवरवाडे यांनी सांगितले. देवरवाडे यांनी ६ टनांपैकी ३ टन बटाटे विकले आणि उर्वरित १५०० किलो बटाट्यांवर प्रक्रिया करून स्वतःच चिप्स बनवले. आता उर्वरित चिप्सची पॅकिंग करून ते अधिकृतरीत्या ब्रँड म्हणून बाजारात विकणार आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here