कोची : केरळच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने आयसीएआर-केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI) अंतर्गत एर्नाकुलम कृषी विज्ञान केंद्राने (KVK) राज्यभर वैज्ञानिक ऊस लागवड आणि गावपातळीवर गूळ उत्पादन केंद्रे उभारण्यासाठी सरकारला धोरणात्मक प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव अलंगड गूळ पुनरुज्जीवन मॉडेलच्या यशावर आधारित आहे. मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांना सादर करण्यात आलेल्या या धोरणात्मक दस्तऐवजात भेसळमुक्त गूळ उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा आराखडा मांडण्यात आला आहे.
2022 पासून कृषी विज्ञान केंद्राने राबविलेल्या अलंगड मॉडेलच्या अनुभवाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अहवालात ऊस लागवड आणि लघु प्रक्रिया केंद्रांची सांगड घातल्यास शाश्वत मूल्यसाखळी उभारता येईल, ज्यामुळे रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी आणि कृषीआधारित उद्योगांना चालना मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, अलंगड उपक्रमांतर्गत प्रति एकर 16 टन ऊस उत्पादन मिळाले आहे. दररोज एक टन ऊस प्रक्रिया क्षमता असलेले केंद्र ऊसाच्या एकूण वजनाच्या सुमारे 10 टक्के गूळ तयार करू शकते. त्यामुळे अशा लघु प्रक्रिया केंद्रांची उभारणी तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरते.
कृषी विज्ञान केंद्राच्या अंदाजानुसार, सुमारे 20 एकर क्षेत्रात टप्प्याटप्प्याने ऊस लागवड केल्यास, जरी ती लहान आणि विखुरलेल्या शेतजमिनींवर असली तरी, दररोज एक टन प्रक्रिया क्षमता असलेल्या गूळ निर्मिती केंद्रासाठी वर्षभर पुरेसा ऊस उपलब्ध होऊ शकतो. अशा केंद्रासाठी सुमारे 20 लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी शासनाचे विविध विभाग, संशोधन संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शेतकरी संघटना, वित्तीय संस्था आणि उद्योजक यांचा सहभाग असलेले विशेष अभियान (मिशन) स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
हे मिशन ऊस लागवड, गूळ उत्पादन आणि मूल्यवर्धित उत्पादनांची साखळी विकसित करण्याबरोबरच कृषी पर्यटन (अॅग्री-टुरिझम) वाढविण्यावरही भर देईल. तसेच ऊस लागवडीसाठी नवीन क्षेत्रांची निवड, शेतकऱ्यांना वैज्ञानिक प्रशिक्षण, विकेंद्रित प्रक्रिया केंद्रांची उभारणी आणि जिल्हास्तरावर गुळाचे ब्रँड विकसित करून मजबूत विपणन व्यवस्था उभारण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. शिनोज सुब्रह्मणियन यांनी हा धोरणात्मक दस्तऐवज मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करताना अलंगाड मॉडेल हे संपूर्ण केरळमध्ये ग्रामीण विकासासाठी आदर्श ठरू शकते, असे सांगितले.

















