रील बनवण्याच्या नादात फटाक्यांची आतषबाजी; नांदेडमध्ये पाच एकर ऊस जळून खाक

नांदेड : सोशल मीडियासाठी रील शूट करण्याच्या नादात केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे एका शेतकऱ्याच्या पाच एकर ऊस पिकाला आग लागून संपूर्ण पीक जळून खाक झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वर्षभर घेतलेल्या कष्टांवर काही क्षणांत पाणी फेरले गेले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नांदेड येथील उत्तर वळण रस्त्यावर काही तरुण-तरुणी सोशल मीडियासाठी रील शूट करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. या फटाक्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जवळच असलेल्या ऊसाच्या शेताला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीने वेगाने पसरत शेतातील सुमारे पाच एकर क्षेत्रावरील उभा ऊस जळून खाक झाला.

ChiniMandi WhatsApp Channel

आधीच दुष्काळजन्य परिस्थिती आणि शेतीतील वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. वर्षभर मेहनत करून वाढवलेले ऊस पीक डोळ्यांसमोर जळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओ बनवण्याच्या उत्साहात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडताना आजूबाजूच्या परिसराची आणि शेतातील पिकांची सुरक्षितता लक्षात घेणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here