कोल्हापूर : सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल प्रकल्पांना परवानगी दिली, मात्र, इथेनॉलच्या दरात वाढ केलेली नाही. शासन कारखान्यांना बिनव्याजी कर्ज देत नाही, तोपर्यंत कारखान्यांचा तोटा वाढत जाणार आहे. कारखान्याकडील सध्याच्या कर्जाचे पुनर्गठन केले तरच साखर कारखाने टिकतील, अशी स्थिती आहे. यावर्षीची परिस्थिती पाहून शासनाने शेतकऱ्यांना उसापोटी प्रतिटन ५०० रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी केली. कारखान्याच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी साखर उद्योगास अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने साखरेच्या हमीभावाबरोबर इथेनॉलच्या दरात वाढ करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सभेत स्वर्गीय पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे गगनबावडा तालुक्यासाठी असणारे योगदान विचारात घेता त्यांचे कारखाना स्थळावर स्मारक व्हावे, असा ठराव संचालक मानसिंग पाटील यांनी मांडला. त्यास सभासदांनी मंजुरी दिली. नव्या पिढीला स्फूर्ती देणारे स्मारक कारखानास्थळी उभारणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ, धैर्यशील घाटगे, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, तानाजी लांडगे, उदय देसाई, पांडुरंग पडवळ, रामा भागोजी जाधव व सभासद उपस्थित होते. सचिव नंदू पाटील यांनी आभार मानले.


















