नवी दिल्ली : देशभरातील मान्सूनबाबतची चिंता अधिक वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार, यंदा देशातील नैऋत्य मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) केवळ 90 टक्के राहण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये हवामान विभागाने 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. नव्या अंदाजामुळे पावसात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. IMD च्या मते, जून महिन्यात कमकुवत एल निनो परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि हंगामाच्या उत्तरार्धात ती अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. एल निनोचा परिणाम भारतात अनेकदा कमी पावसाच्या स्वरूपात दिसून येतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ईशान्य भारतात सामान्य पाऊस पडू शकतो. मात्र उत्तर-पश्चिम, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पातील भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. याशिवाय जून 2026 मध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटेचे दिवस अनुभवायला मिळू शकतात. महाराष्ट्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांतही उष्णतेचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सूनच्या या नव्या अंदाजामुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाढली आहे. भारतातील सुमारे 51 टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसात घट झाल्यास खरीप हंगामातील उत्पादन, ग्रामीण बाजारपेठेतील मागणी आणि अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.तज्ज्ञांच्या मते, कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढू शकतो आणि अन्नधान्य महागण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2023 मध्येही एल निनोच्या प्रभावामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता.















