देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत, मात्र पेट्रोलियम अथवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे याबाबत अधिकृत पुरावा दिलेला नाही, साखर उद्योग व ऊस उत्पादकांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असून, त्याच्यामुळेच साखर कारखानदारी टिकून राहिली आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी स्पेंट वॉश व सीएनजी निर्मिती केली जाणार आहे. एकही उपघटक वाया न घालवता देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा श्री. फडणवीस यांनी केली.

कागल येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, हिंदुराव घाटगे विद्यामंदिरचा जीर्णोद्धार आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्षस्थानी होत्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘भारत छोडो आंदोलनाच्या क्रांतिकारी पर्वाच्या स्मरणदिनी राजर्षी शाहू महाराजांसारख्या थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, डॉ. वाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांचा विचार या त्रिसूत्रीवर शासन काम करीत आहे. राधानगरी धरण हे शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे व अभियांत्रिकी कौशल्याचे उदाहरण आहे,’

ChiniMandi WhatsApp Channel

फडणवीस म्हणाले, ‘इथेनॉलमुळे ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य झाले असून, ५६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करते. तसेच ५८ हजार कोटींची थकबाकी शासनाने भरली आहे,’ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शाहू महाराजांचे शेतकरी हिताचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कर्जमुक्तीनंतर विकासाच्या पुढील टप्याला सुरुवात झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

समरजितसिंह म्हणाले, ‘आम्ही सौरऊर्जेबाबत आग्रही आहोत. साखर कारखाना परिसरात ड्रोन तंत्राचा वापर आम्ही सुरू केला. हवामान केंद्रेही उभारली जात आहेत. राजे विक्रमसिंह बँकेत ७२ शेतकऱ्यांची नोंदणी केल्याचे सांगितले. आम्ही दोघेही एकदिलाने काम करून कागलचे नंदनवन करू.’ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राहुल आवाडे, अशोकराव माने, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रुपाराणी निकम आदी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here