‘यास’ चक्रीवादळाची चाहूल, ओडिसामध्ये रेड अलर्ट, एनडीआरएफची पथके तैनात

नवी दिल्ली : देशाच्या पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळाचा धोका समोर आला आहे. बंगालच्या उपसागरात सुरू झालेले हे चक्रीवादळ आज, २४ मे रोजी सायंकाळी ओडिसा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडक देऊ शकते. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या उपसागरात पूर्व-मध्य क्षेत्रापासून याचे रुपांतर भीषण चक्रीवादळात होऊ शकते. या चक्रीवादळापासून बचावासाठी तयारी सुरू आहे.

यास चक्रीवादळापासून बचावासाठी कोलकाता शहरात ७४ केंद्रांची तपासणी करण्यात आली. तर ओडिसामध्ये ८ जिल्ह्यांना रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. ओडिसा, बंगालमध्ये एनडीआरएफची पथके तैनात आहेत. केंद्र सरकार या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत याबाबत एक आढावा बैठकही घेतली.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन भारतीय वायूसेनाही सक्रीय झाली आहे. वायूसेनेने एनडीआरएफच्या पथकांना एअरलिफ्ट केले आहे. २६ अतिरिक्त हेलिकॉफ्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. नौसेनाही सज्ज आहे. एनडीआरएफची पथके पश्चिम बंगाल, ओडिसामध्ये संभाव्य धोक्याच्या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. एनडीआरएफने बचाव पथकांसह पाणबुड्यांना ओडिसा, बंगालमध्ये पाठवले आहे. पश्चिम बंगाल सरकारनेही याबाबत पावले उचलली आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी संध्याकाळी हे चक्रीवादळ किनारपट्टीवर येईल. त्याचा वेग ताशी १५५-१६५ प्रती किमी असेल. त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळाची तीव्रता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने पुरी, भुवनेश्वरला जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here