सोलापूर : जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना बुधवारी १६ साखर कारखान्यांच्या चेअरमननी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. साखरेच्या उताऱ्यानुसार ऊसदर देण्याची तयारी असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. ‘कोल्हापूर पॅटर्न’नुसार दर देण्यास कारखानदारांची तयारी असली, तरी अनेक कारखान्यांचा सध्याचा साखर उतारा अवघा आठ टक्के असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून साखर उताऱ्याची वस्तुस्थिती समोर आणण्याची सूचना केली.
जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पालकमंत्र्यांनी प्रतिटन ३,२५० रुपये, त्यानंतर १०० रुपये आणि पुढे आणखी १०० रुपये असा दराचा प्रस्ताव मांडला होता. पश्चिम भागातील साखर कारखान्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शविली. मात्र, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि बार्शी तालुक्यांतील १६ कारखान्यांनी या प्रस्तावाला अद्याप मान्यता दिलेली नाही.या कारखान्यांचे आर्थिक गणित अडचणीत असल्याचे चेअरमननी जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. साखरेचा उतारा कमी असल्याने अपेक्षित दर देताना आर्थिक अडचणी येत असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. त्यामुळे साखर उताऱ्याच्या आधारावर ऊसदर निश्चित करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
कारखानदारांची पोलिस अधीक्षकांकडेही धाव
दरम्यान, कारखानदारांनी पोलिस अधीक्षकांचीही भेट घेऊन निवेदन सादर केले. शेतकरी संघटनेकडून कारखान्यांचे गाळप बंद पाडले जात असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. तसेच पाणीटंचाईमुळे शेतातील ऊस जळत असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची व्यथाही कारखानदारांनी मांडली.या बैठकीस माजी आमदार राजन पाटील, लोकमंगलचे सतीश देशमुख, प्रशांत परिचारक, प्रणव परिचारक, बब्रुवाहन माने, लोकशक्तीचे डॉ. अमोल पाटील, संत दामाजीचे शिवानंद पाटील, जकरायाचे जाधव यांच्यासह विविध साखर कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे आणि संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट होऊ शकली नाही.एकीकडे कारखानदारांची आर्थिक अडचणींची भूमिका, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची योग्य दरासाठीची मागणी यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अद्यापही अनिर्णित आहे. आता जिल्हा प्रशासन या प्रश्नावर कोणता मार्ग काढणार आणि ऊस उत्पादकांना कोणता दर मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


















