ढगे खांडसरी, गुळ पावडर कारखान्यातर्फे चांगला ऊसदर देण्याचा प्रयत्न : अध्यक्ष दादाराव ढगे

नांदेड : पिंपळकोठा मगरे येथे अनुसयाबाई ढगे खांडसरी साखर व गूळ पावडर कारखान्याचा प्रथम ऊस मोळी पूजन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ऊस मोळी पूजन अनुसया ढगे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, संस्थापक दादाराव ढगे, अध्यक्ष ओमकार ढगे, दामिनी ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दादाराव ढगे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात काटामारी होणार नाही, याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी उसाचे वजन करून त्याची शहानिशा करावी, असे खुले आव्हान त्यांनी दिले. भोकर विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत चांगला ऊसदर देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संघर्षातून कारखाना उभारण्यात आलेला अनुसया ढगे कारखाना शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी फायदेशीर ठरणार आहे, असे सांगितले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उभारण्यात आलेला अनुसयाबाई ढगे खांडसरी साखर व गूळ पावडर कारखाना शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. माजी आमदार अविनाश भाटे, माजी सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुरेंद्र घोडसकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, भगवानराव मनुरकर, गोविंदराव शिंदीकर, संतोष गव्हाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मुरली हंबर्डे यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here