महाराष्ट्र : एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांना दणका; आता थेट उच्च न्यायालयात दाद

पुणे : केंद्र सरकारने २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) प्रतिटन ३,६५० रुपये निश्चित केला असतानाही काही साखर कारखान्यांकडून त्यापेक्षा कमी दर जाहीर केला जात असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘सरकारनामा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कारखान्यांच्या या मनमानीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

ऊस नियंत्रण मंडळ स्थापन न केल्याचा सरकारला जाब

ChiniMandi WhatsApp Channel

या याचिकेत साखर कारखान्यांकडून मनमानी पद्धतीने ऊसदर जाहीर करण्याच्या प्रकारावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच कायद्याने बंधनकारक असतानाही राज्य सरकारने अद्याप ‘ऊस नियंत्रण मंडळा’ची स्थापना का केली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्र ऊस दर नियमन अधिनियम, २०१३ मधील कलम ३ नुसार राज्य सरकारने ऊस नियंत्रण मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. साखर कारखान्यांना स्वतःच्या मर्जीने ऊसदर जाहीर करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.या मंडळाने रंगराजन समितीच्या सूत्रानुसार उसाचा अंतिम दर निश्चित करणे अपेक्षित आहे. मात्र, मंडळाची स्थापना न झाल्यामुळे साखर कारखाने स्वतःच ऊसदर जाहीर करत आहेत. हा प्रकार कायद्याचे उल्लंघन करणारा असून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

अहिल्यानगरमधील कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर केल्याचा आरोप

केंद्र सरकारने २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी प्रतिटन ३,६५० रुपये एफआरपी निश्चित केली आहे. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी त्यापेक्षा कमी दर जाहीर केल्याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामध्ये भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना – ३,२०० रुपये प्रतिटन,अशोक सहकारी साखर कारखाना – ३,१५० रुपये प्रतिटन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना – ३,२०० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. या कारखान्यांसह इतर कारखान्यांनीही एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर करून कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना पहिला हप्ता ४,५०० रुपये देण्याची मागणी

साखर कारखान्यांना दिलासा देण्याऐवजी शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका याचिकेत मांडण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून प्रतिटन ४,५०० रुपये मिळावेत, तसेच ७०:३० या सूत्रानुसार अंतिम ऊसदर निश्चित करून तो शेतकऱ्यांना मिळणे न्याय्य असल्याचे याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणी ३ डिसेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार असल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष न्यायालयाच्या भूमिकेकडे लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here