धाराशिव : यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीपासून पावसाने दडी मारली आहे. कळंब तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना मोठा फटका बसला. आता दुष्काळाची झळ ऊस पिकालाही बसत आहे. तालुक्यात काही दिवसांपूर्वी हिरवेगार दिसणारे ऊस पीक आता करपण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यात यंदा नवीन उसाची लागवड झालेली नसून, सध्या मोठ्या प्रमाणात खोडवा ऊस शेतात आहे. हा ऊस जगविण्यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचाच आधार आहे. शेतकऱ्यांनी उसाची वाढ १७ते १८ कांड्यांपर्यंत केली. मात्र, आता पाण्याअभावी पुढील वाढ खुंटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी उसासाठी मशागत, खत व मजुरीवर मोठा खर्च झाला आहे. पण पाणीटंचाईमुळे अपेक्षित वाढ होत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन हातचे गेल्यानंतर आता ऊस वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. मात्र कडक उन्हाचा तडाखा असाच कायम राहिल्यास उसाची पाने वाळण्याबरोबर उत्पादनक्षमतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाच्या भरवशावर ऊस चांगला वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. जमिनीतील ओलावा संपला असून विहिरी व कूपनलिकांमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे उभ्या पिकाला पाणी देणेही कठीण आहे. विहिरी, कूपनलिका व अन्य जलस्रोतांनी तळ गाठला आहे. पाण्याअभावी उसाची वाढ खुंटली असून, आगामी काळात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. महसूल प्रशासनाने ऊस पिकाची पाहणी करून पाणी, वीज व दुष्काळी मदतीबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.


















